धक्कादायक! श्रीरामपूरमध्ये अल्पवयीन मुलाने दोघा भावांवर झाडल्या गोळ्या
By सुदाम देशमुख | Updated: March 6, 2025 21:34 IST2025-03-06T21:33:34+5:302025-03-06T21:34:10+5:30
दोघे मुले बचावले : श्रीरामपुरातील घटना, आरोपी मुलगा फरार.

धक्कादायक! श्रीरामपूरमध्ये अल्पवयीन मुलाने दोघा भावांवर झाडल्या गोळ्या
लोकमत न्यूज नेटवर्क, श्रीरामपूर (जि. अहिल्यानगर) : शहरातील भैरवनाथनगर येथे एका अल्पवयीन मुलाने दोघा भावांवर पिस्तुलातून दोन गोळ्या झाडल्या. यानंतर आरोपी फरार झाला आहे. याप्रकरणी एका अल्पवयीन मुलाने शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. गुरुवारी दुपारी ही घटना घडली.
भैरवनाथनगर येथे सहा जणांचे कुटुंब राहते. त्यांच्या आत्याने याच परिसरात घराचे बांधकाम सुरू केले आहे. त्याची देखरेख करण्यासाठी दोघे मुले तेथे गेले होते. त्यावेळी आरोपी मुलगा दुचाकीवरून तेथे आला. त्याने चौघा भावांपैकी एकाला जिवे मारण्याची धमकी दिली. कमरेला लावलेल्या पिस्तुलातून भावाच्या दिशेने गोळी झाडली. गोळी जमिनीवर आदळून त्याच्या पायाला लागली. ही घटना पाहून तिथून पळालो. त्यावेळी आरोपीने माझ्या दिशेने गोळी झाडली. मी ती गोळी चुकवली. त्यामुळे थोडक्यात बचावलो, असे बचावलेल्या एका मुलाने फिर्यादित म्हटले आहे.
घटनेनंतर आजूबाजूचे लोक जमा झाले. त्यामुळे आरोपी मुलाने सूतगिरणी परिसराच्या दिशेने पळ काढला. भावाबरोबर असलेल्या जुन्या वादातून हा गोळीबार केल्याचे फिर्यादी मुलाचे म्हणणे आहे. घटनेतील फिर्यादी व आरोपी हे दोघेही अल्पवयीन आहेत.