सभागृहनेते पदावरून शिवसेनेत खलबते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:20 IST2021-09-13T04:20:51+5:302021-09-13T04:20:51+5:30
अहमदनगर : महापालिकेच्या सभागृहनेते पदासाठी शिवसेनेकडून अशोक बडे यांचे नाव आघाडीवर असतानाच माजी महापौर सुरेखा कदम व ज्येष्ठ नगरसेवक ...

सभागृहनेते पदावरून शिवसेनेत खलबते
अहमदनगर : महापालिकेच्या सभागृहनेते पदासाठी शिवसेनेकडून अशोक बडे यांचे नाव आघाडीवर असतानाच माजी महापौर सुरेखा कदम व ज्येष्ठ नगरसेवक अनिल शिंदे यांनीही सभागृहनेते पदाची पक्षाकडे मागणी केली आहे. त्यामुळे शिवसेनेत सभागृहनेते पदासाठी खलबते सुरू असून, पक्षश्रेष्ठींकडून कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब केला जातो, याची उत्सुकता आहे.
महापालिकेत शिवसेना व राष्ट्रवादीने एकत्र येत सत्ता स्थापन केली आहे. महापौरपद सेनेकडे, तर स्थायी समिती सभापती व उपमहापौर, ही दोन्ही महत्त्वाची पदे राष्ट्रवादीकडे आहेत. सेनेने सभागृहनेता व महिला बालकल्याण समिती सभापती पदावर दावा केला आहे. महिला व बालकल्याण समितीच्या सभापती व उपसभापती पदासाठी येत्या बुधवारी निवडणूक होत आहे. सोबतच सभागृहनेता बदलाच्या हालचालींना वेग आला आहे. सभागृहनेते पदासाठी बोल्हेगावचे सेनेचे नगरसेवक अशोक बडे यांचे नाव आघाडीवर असल्याचे बोलले जाते. असे असले तरी सभागृहनेते पदासाठी सेनेकडून आणखी काही जण इच्छुक आहेत. माजी शहर प्रमुख संभाजी कदम यांनी पत्नी माजी महापौर सुरेखा कदम यांच्यासाठी पक्षाकडे मागणी केली आहे. तसेच ज्येष्ठ नगसेवक अनिल शिंदे हेही सभागृहनेते पदासाठी इच्छुक आहेत. महापालिकेत महाविकास आघाडीची सत्ता स्थापनेत शिंदे यांची भूमिका महत्त्वाची राहिली आहे. सभागृहनेते पदाची बडे यांच्या पाठोपाठ आता कदम व शिंदे यांनीही पक्षाकडे मागणी केल्याने या पदासाठी सेनेत रस्सीखेच पाहायला मिळणार आहे.
.....
पक्षश्रेष्ठींच्या भूमिकेकडे लक्ष
शहर शिवसेनेत दोन गट आहेत. एका गटाने राष्ट्रवादीशी आघाडी करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली असून, दुसरा गट राष्ट्रवादीच्या विरोधात आहे. सभागृहनेता नेमताना पक्षश्रेष्ठी कोणत्या गटाला प्राधान्य देतात, याकडे लक्ष लागून आहे.