पद वाटपावरून शिवसेना कार्यालयात गोंधळ
By Admin | Updated: August 5, 2016 23:44 IST2016-08-05T23:35:20+5:302016-08-05T23:44:19+5:30
अहमदनगर : महापालिकेतील सभागृहनेतेपद कोणाला द्यायचे, यावरून चितळे रोड, नेता सुभाष चौकातील शिवसेनेच्या कार्यालयात शुक्रवारी दुपारी एकच गोंधळ झाला.

पद वाटपावरून शिवसेना कार्यालयात गोंधळ
अहमदनगर : महापालिकेतील सभागृहनेतेपद कोणाला द्यायचे, यावरून चितळे रोड, नेता सुभाष चौकातील शिवसेनेच्या कार्यालयात शुक्रवारी दुपारी एकच गोंधळ झाला. नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये सुरू असलेले वाद धराधरीपर्यंत गेले. सभागृहनेतेपद एका नगरसेवकाला द्यायचा निर्णय झाल्यानंतर दुसऱ्या नगरसेवकाच्या कार्यकर्त्यांनी संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर यांनाच शिवीगाळ करून धक्काबुक्की केली.
महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतीपदाची शुक्रवारी सकाळी निवडणूक झाली. त्यामध्ये शिवसेनेचे सचिन जाधव यांची बिनविरोध निवड झाली. सभापतीपद जाधव यांना दिल्यानंतर सभागृहनेतेपद, शिवसेनेचे शहरप्रमुखपद कोणाला द्यायचे, याबाबत माजी आमदार व उपनेते अनिल राठोड यांच्या चितळे रोडवरील कार्यालयात (शिवालय) शुक्रवारी दुपारी बैठक सुरू होती. माजी महापौर शीला शिंदे यांचे पती व नगरसेवक अनिल शिंदे यांना सभागृहनेतेपद देण्याचा बैठकीत निर्णय झाला. दरम्यान हे पद मला द्यावे, अशी मागणी नगरसेवक गणेश कवडे यांनी केली. माजी आमदार राठोड यांनी आपणास शब्द दिला होता, याची आठवण कवडे करून देत होते. मात्र कवडे यांची ही मागणी कोरगावकर यांनी फेटाळली. त्यामुळे कवडे यांचे समर्थक संतप्त झाले. त्यांनी थेट कोरगावकर यांच्यावरच हल्ला केला. त्यांना शिवीगाळ करीत धक्काबुक्की केली. जास्त गोंधळ होवू नये म्हणून कोरगावकर हे शिवालयातून निघून गेले. या बैठकीला उपनेते अनिल राठोड, दक्षिण जिल्हा प्रमुख प्रा. शशिकांत गाडे, शहरप्रमुख संभाजी कदम, माजी महापौर भगवान फुलसौंदर यांच्यासह आजी-माजी नगरसेवक उपस्थित होते. (प्रतिनिधी)
सभागृहनेतेपद कोणाला द्यायचे, याबाबत शिवसेनेच्या कार्यालयात बैठक सुरू होती. यावेळी अनिल शिंदे यांना पद देण्याबाबत चर्चा सुरू असताना बैठकीमध्ये आरडाओरड झाली. काही कार्यकर्ते जय भवानी-जय शिवाजी अशा घोषणा देत होते. मला मारहाण किंवा धक्काबुक्की झाली नाही. सर्व नेते-पदाधिकारी-नगरसेवक आम्ही एकत्र असून कोणतेही वाद झाले नाहीत.
-भाऊ कोरगावकर, संपर्कप्रमुख
मला पद देण्याचा निवडणुकीपूर्वी शब्द दिला होता. त्यासाठी सर्वांनीच माझ्या नावाला संमती दिली असताना कोरगावकर यांनी अनिल शिंदे यांचे नाव पुढे केले. त्यावेळी हात जोडून मी पद देण्याची विनंती केली. मात्र पद मिळत नसल्याने तेथे आलेले माझे कार्यकर्ते संतापले. त्यांनी कोणतीही शिवीगाळ केली नाही किंवा मारहाणही केली नाही. आमचे उपनेते अनिल राठोड यांचा शब्द माझ्यासाठी अंतिम आहे.
- गणेश कवडे, नगरसेवक.