महापौर पदासाठी शिवसेना- राष्ट्रवादीच्या एकीच्या हालचाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:15 IST2021-06-21T04:15:57+5:302021-06-21T04:15:57+5:30
अहमदनगर : येथील महापौर निवडणुकीसाठी शिवसेना व राष्ट्रवादीला महाविकास आघाडीच्या झेंड्याखाली एकत्र आणण्याच्या हालचालींना वेग आला आहे. महापौरपदाची चर्चा ...

महापौर पदासाठी शिवसेना- राष्ट्रवादीच्या एकीच्या हालचाली
अहमदनगर : येथील महापौर निवडणुकीसाठी शिवसेना व राष्ट्रवादीला महाविकास आघाडीच्या झेंड्याखाली एकत्र आणण्याच्या हालचालींना वेग आला आहे. महापौरपदाची चर्चा अंतिम टप्प्यात आली असून, समन्वय समितीची बैठक घेऊन लवकरच निर्णय जाहीर केला जाईल, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून देण्यात आली. या निवडणुकीमुळे पुढील दहा दिवस नगरकरांचे चांगलेच मनोरंजन होणार आहे.
महापौर बाबासाहेब वाकळे यांची मुदत ३० जून रोजी संपुष्टात येत आहे. त्यापूर्वी महापौर निवडणूक घेणे आवश्यक आहे. त्यासाठीचा प्रस्ताव महापालिकेने विभागीय आयुक्तांना पाठविलेला आहे. परंतु, अद्याप निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला नाही. शेवटचे दहा दिवस हाती आहेत. त्यामुळे पडद्याआडून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महाविकास आघाडीच्या समन्वय समितीची बैठक घेऊन निर्णय जाहीर करावा, असा आग्रह सेनेच्या स्थानिक नेत्यांनी वरिष्ठांकडे धरला आहे. तिन्ही पक्षांच्या नेत्यांची समन्वय बैठक लवकरच होईल, असेही सेनेच्या काही नगरसेवकांचे म्हणणे आहे. महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे. परंतु, राष्ट्रवादीकडे सक्षम उमेदवार नाही. काँग्रेसकडे उमेदवार आहे. परंतु, काँग्रेसचे संख्याबळ कमी आहे. राज्यात सेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची महाविकास आघाडी आहे. राष्ट्रवादी व काँग्रेसच्या पाठिंब्यावर सेनेचा महापौर, असे काही गणित स्थानिक पातळीवर जुळविले जात आहे. परंतु, तसा निर्णय वरिष्ठ पातळीवर होणे अपेक्षित आहे. राज्यातील महाविकास आघाडी पाहता सेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसला नगर महापौर पदासाठी एकत्र यावे लागेल. स्थानिक नेतेही एकत्र येण्याच्या मानसिकतेत आहेत. सेनेकडून महापौर पदाचा दावा केला जात असून, त्याविरोधात राष्ट्रवादीने अद्याप भूमिका मांडलेली नाही. राष्ट्रवादीचीही सेनेला एक प्रकारे मूक संमती आहे. कारण वरिष्ठांचा आदेश राष्ट्रवादी डावलण्याच्या मानसिकतेत सध्या तरी दिसत नाहीत. वरिष्ठांच्या आदेशाचे पालन करणार असल्याचे राष्ट्रवादीकडून सांगण्यात येत असून, वरिष्ठांकडून लवकरच निर्णय जाहीर केला जाईल. महापौरपद सेनेला, तर, उपमहापौर राष्ट्रवादीचा होईल, असे सत्तेचे गणित जवळपास निश्चित असल्याचे बोलले जाते.
....
काँग्रेस-बसपाच्या हालचाली
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दीप चव्हाण यांच्या पत्नी शीला चव्हाण यांचे नाव महापौर पदासाठी चर्चेत आहे. परंतु, चव्हाण हे महापौर पदासाठी राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्यावर अवलंबून आहेत. सेनेचा महापौर झाल्यास उपमहापौर पदासाठी बसपाकडून प्रयत्न सुरू आहेत. परंतु, सेना व राष्ट्रवादी एकत्र आल्यास अन्य पक्षांना महाविकास आघाडीच्या वळचणीला जाण्याशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही, असे बोलले जाते.