शिर्डीत फौजदारास धक्काबुक्की
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2017 21:06 IST2017-08-31T21:02:52+5:302017-08-31T21:06:09+5:30
दोन गटातील हाणामाºया सोडविण्यास गेलेल्या फौजदारास धक्काबुक्की केल्याप्रकरणी साकुरी येथील तिघांविरूद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा राहाता पोलिसांनी दाखल करून आरोपींना अटक केली.

शिर्डीत फौजदारास धक्काबुक्की
राहाता : दोन गटातील हाणामाºया सोडविण्यास गेलेल्या फौजदारास धक्काबुक्की केल्याप्रकरणी साकुरी येथील तिघांविरूद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा राहाता पोलिसांनी दाखल करून आरोपींना अटक केली. मुजोर झालेल्या गुंडगिरीचा फटका खुद्द फौजदारास बसल्याने नागरिकांमध्ये याबाबत जोरदार चर्चा रंगली होती.
बुधवारी रात्री सारे नऊ वाजेच्या सुमारास राहाता येथील चितळी रस्त्यावरील सुमित फॅशन या कापड दुकानासमोर ही घटना घडली. फौजदार विशाल वाठोरे व त्यांचे सहकारी गणेशोत्सवानिमित्त गस्तीवर असताना दोन गटात भांडणे सुरू असल्याचे दिसले. वाद आणखी वाढू नये म्हणून फौजदार वाठोरे यांनी किशोर दंडवते, संदीप बनसोडे, सचिन बनसोडे यांना विचारणा केली. तेव्हा तिन्ही आरोपींनी, ‘साहेब आमचे वैयक्तिक भांडण आहे, तुम्ही मध्ये पडू नका. येथून निघून जा,’ असे म्हणत तिघांनी फौजदार वाठोरे यांना धक्काबुक्की केली. तसेच सरकारी कामात अडथळा आणला. वाठोरे यांच्या फिर्यादीवरून राहाता पोलिसांनी किशोर दंडवते, मंदिर बनसोडे, सचिन बनसोडे या तिघांविरूध्द सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला. तसेच तिन्ही आरोपींना अटक केली. न्यायालयाने तिघांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम करीत आहेत.
मिरवणूक बंद करुन गणपतीचे विसर्जन
दोन गटातील या वादामुळे राहाता शहरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. यातील एका गटाची गणपती विसर्जन मिरवणूक सुरू असतानाच ही हाणामारी झाल्याने मिरवणूक बंद करून गणपतीचे विसर्जन करण्यात आले. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठी घटना टळली.