शिर्डीचे चार पोलीस निलंबित

By Admin | Updated: April 2, 2016 00:34 IST2016-04-02T00:25:55+5:302016-04-02T00:34:11+5:30

शिर्डी : गुरुवारी शिर्डी पोलीस ठाण्यात झालेल्या किरण रोकडे मृत्यू प्रकरणी शुक्रवारी जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ त्रिपाठी यांनी चार पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केले

Shirdi's four policemen were suspended | शिर्डीचे चार पोलीस निलंबित

शिर्डीचे चार पोलीस निलंबित

शिर्डी : गुरुवारी शिर्डी पोलीस ठाण्यात झालेल्या किरण रोकडे मृत्यू प्रकरणी शुक्रवारी जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ त्रिपाठी यांनी चार पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केले तर पोलीस निरीक्षक वाघ यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी दिली़
गुरुवारी दुपारी किरण रोकडे या युवकाचा पोलीस ठाण्यात मृत्यू झाला होता़ किरणने कमरेच्या बेल्टने आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले होते़ मात्र, किरणचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीत झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला होता़ किरणच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्या पोलिसांवर कारवाई करावी, या मागणीसाठी नातेवाईकांनी काही काळ रास्ता रोकोही केला होता़
गुरुवारी सायंकाळी उशिरा पोलीस अधीक्षक त्रिपाठी यांनी शिर्डीला भेट देऊन माहिती घेतली़ सोमवारी त्रिपाठी यांनी ठाणे अंमलदार अयुब शेख, लॉकअप इन्चार्ज रज्जाक शेख, आऱ डी़ आव्हाड, एस़ बी़ माने या चार कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचा तर शिर्डीचे पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांची नियंत्रण कक्षात बदली करण्याचा आदेश काढला़ यानंतर काही वेळातच वाघ यांनी आपला पदभार सोडला़ तर जिल्हा विशेष शाखेतील पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण यांची शिर्डीला बदली करण्यात आली असून, त्यांनी सायंकाळी पदभार स्वीकारला़ (तालुका प्रतिनिधी)
सीआयडीकडून तपास सुरू : दरम्यान, पोलीसच आरोपीच्या पिंजऱ्यात असल्याने निपक्ष व पारदर्शी चौकशी करण्यासाठी गुरुवारी रात्रीच हा तपास राज्य गुन्हे अन्वेषन (सीआयडी) विभागाकडे सोपवण्याचा निर्णय घेण्यात आला़ शुक्रवारी या विभागाच्या अधीक्षकांनी शिर्डीला भेट देवून सर्व घटनेची बारकाईने माहिती घेतली़ त्यांनी रुग्णालयाला भेट देवून डॉक्टरांशीही चर्चा केली़
पुण्यात शवविच्छेदन : किरणच्या मृत्युस पोलीस जबाबदार असल्याचा आरोप नातेवाईकांकडून करण्यात आला असला तरी शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर किरणच्या मृत्युचे खरे कारण स्पष्ट होईल़ शुक्रवारी पुणे येथे डॉक्टरांच्या पथकाने किरणच्या देहाचे शवविच्छेदन केले. सायंकाळी पुण्याहून निघालेला मृतदेह रात्री उशीरा शिर्डीत येणार होता.

Web Title: Shirdi's four policemen were suspended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.