चेन्नई भाविकांनी गाठली पायी शिर्डी
By Admin | Updated: July 27, 2014 01:08 IST2014-07-26T23:16:40+5:302014-07-27T01:08:19+5:30
शिर्डी : माझा माणूस सातासमुद्रापार असला तरी चिमणीच्या पायाला दोर बांधून ओढत आणतात तसे मी त्याला आणीन, असे साईबाबा नेहमी म्हणत़ याचा प्रत्यय शिर्डीत बघायला मिळाला़

चेन्नई भाविकांनी गाठली पायी शिर्डी
शिर्डी : माझा माणूस सातासमुद्रापार असला तरी चिमणीच्या पायाला दोर बांधून ओढत आणतात तसे मी त्याला आणीन, असे साईबाबा नेहमी म्हणत़ याचा प्रत्यय शिर्डीत बघायला मिळाला़ साईबाबांवरील श्रद्धेमुळे निर्माण झालेल्या आत्मिक बळाच्या सामर्थ्यावर चेन्नईहून तब्बल साडेसोळाशे किलोमीटर अंतर पायी चालत आलेल्या चौदा भाविकांनी शनिवारी साईदरबारी हजेरी लावली,
साईदर्शनाने त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले़ यात्रा पूर्तीचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता़ चेन्नईचे साईभक्त व्ही़ चंद्रमोळी गेल्या पाच वर्षांपासून चेन्नई ते शिर्डी पायी येत आहेत़ यंदा त्यांच्या बरोबर १३ भाविकही शिर्डी वारीला आले़ यात एक महिलाही आहे़ या सर्वांचे संस्थानच्या वतीने उपकार्यकारी अधिकारी अप्पासाहेब शिंदे यांनी स्वागत केले़ यावेळी जनसंपर्क अधिकारी मोहन यादव उपस्थित होते़
या भाविकांनी १६५० किमी अंतर ३१ दिवसांत पूर्ण केले़ येताना त्यांनी वाटेत तिरुपती बालाजी, तसेच पंढरपूरच्या विठोबाचेही दर्शन घेतले़ चेन्नईतील मैलापूरच्या मंदिरातून या पदयात्रेला सुरूवात झाली़ तेथून पाँडेचेरीच्या दिशेने सत्तर किलोमीटर अंतरावर असलेल्या पट्टीपुलम साईमंदिरात ते दर्शनासाठी गेले़ तेथे या मंदिराचे संस्थापक व साईबाबा संस्थानला एकशे दहा कोटी रुपयांचे भक्तनिवास देणगी रूपाने बांधून देणाऱ्या के. व्ही. रमणी यांनी प्रत्येक पदयात्रीच्या गळ्यात तुळशीमाळ घालून त्यांना शिर्डी प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या़
या भाविकांनी खांद्यावर साईपालखीही आणली आहे़ पुढील वर्षी रथ आणण्याचा त्यांचा मानस आहे़ या यात्रेत अनेक चित्तथरारक अनुभव आले़ यातून बाबांच्या सर्वव्यापी अस्तित्वाची खात्री पटल्याचे चंद्रमोळी यांनी ‘लोकमत’ला सांगितले़
(तालुका प्रतिनिधी)