शिर्डीत सर्वधर्मीय विवाह सोहळा; अवघ्या रूपयात बोहल्यावर चढण्याची संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 12:49 IST2018-02-14T12:49:13+5:302018-02-14T12:49:53+5:30
बेरोजगारी, शेतक-यांच्या आत्महत्या या पार्श्वभूमीवर साईनगरीत केवळ एक रूपयात लग्नाच्या बोहल्यावर चढण्याची संधी मिळणार आहे. साईसिध्दी चॅरिटेबल ट्रस्ट व शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने १८ एप्रिल रोजी अक्षयतृतीयेच्या गोरज मुहूर्तावर १०१ सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले आहे.

शिर्डीत सर्वधर्मीय विवाह सोहळा; अवघ्या रूपयात बोहल्यावर चढण्याची संधी
शिर्डी : दुष्काळ, बेरोजगारी, शेतक-यांच्या आत्महत्या या पार्श्वभूमीवर साईनगरीत केवळ एक रूपयात लग्नाच्या बोहल्यावर चढण्याची संधी मिळणार आहे. साईसिध्दी चॅरिटेबल ट्रस्ट व शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने १८ एप्रिल रोजी अक्षयतृतीयेच्या गोरज मुहूर्तावर १०१ सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले आहे. या विवाह सोहळ्यात राज्यातील व देशातील जास्तीत जास्त वधू वरांनी सहभागी व्हावे, असे आवाहन सोहळ्याचे निमंत्रक स्वागताध्यक्ष, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे व आयोजक कैलास कोते यांनी केले आहे.
सोळा वर्षांपासून माजी नगराध्यक्ष कैलास कोते व त्यांच्या पत्नी माजी नगराध्यक्षा सुमित्रा कोते या सोहळ्याचे आयोजन करतात. आजवर या माध्यमातून सतराशे जोडपी विवाह बंधनात अडकली आहेत. या सोहळ्यात आयोजकांच्या वतीने वधू वरांना पोषाख, साडी, वधुसाठी मंगळसूत्र, संसारोपयोयी वस्तू, साईंची प्रतिमा तसेच व-हाडी मंडळींसाठी मिष्टान्न भोजन देण्यात येते. तसेच वरांची साईदर्शनानंतर शिर्डी गावातून घोडे, उंट व सजविलेल्या वाहनांतून ढोल ताशांच्या निनादात व फटाक्यांच्या आतषबाजीत भव्य मिरवणूक काढण्यात येते़ या विवाह सोहळ्यात सहभागी होण्यासाठी वधू वरांची नावनोंदणी सुरू करण्यात आली आहे.