शेवगाव तालुक्यात पावसाचा हाहाकार, जनावरे, वाहने गेली वाहून. १५० नागरिकांना हलवले सुरक्षितस्थळी. १०० लोक अद्यापही पुराच्या पाण्यात अडकल्याची भीती.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2021 12:13 IST2021-08-31T12:13:01+5:302021-08-31T12:13:50+5:30
शेवगाव : तालुक्यात सोमवारी रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेकांचे अतोनात नुकसान झाले असून,नद्यांचे पाणी गावागावात घुसल्याने आखेगाव परिसराच्या गावातील जनावरे, वाहने वाहून गेली आहेत.

शेवगाव तालुक्यात पावसाचा हाहाकार, जनावरे, वाहने गेली वाहून. १५० नागरिकांना हलवले सुरक्षितस्थळी. १०० लोक अद्यापही पुराच्या पाण्यात अडकल्याची भीती.
शेवगाव : तालुक्यात सोमवारी रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेकांचे अतोनात नुकसान झाले असून,नद्यांचे पाणी गावागावात घुसल्याने आखेगाव परिसराच्या गावातील जनावरे, वाहने वाहून गेली आहेत.
आभाळातून कोसळणाऱ्या मुसळधार धारा, घरादारात शिरलेले पाणी यामुळे या भागातील नागरिकांनी भीतीच्या छायेखाली रात्र जागून काढली आहे. तर आखेगाव येथील नानी नदीच्या पलीकडे जवळपास १०० नागरिक अडकले असून त्यांना तेथून बाहेर काढण्यासाठी प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरु असल्याचे तहसीलदार अर्चना पागिरे यांनी सांगितले आहे.
तालुक्यातील शेवगाव महसूल मंडळात सोमवारी रात्री अतिवृष्टी झाली असून २४ तासात ११० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर अन्य महसूल मंडळात पावसाचा जोर कायम असल्याने तालुक्यातील बहुतांश नद्यांना आलेल्या पुराने धोक्याची पातळी ओलांडली आहे. आखेगाव, भगूर, वडुले गावात पुराचे पाणी शिरले आहे. तेथील काही नागरिकांना प्रशासनाच्या वतीने सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. पुराच्या पाण्यात अनेकांचे जनावरे, वाहने वाहून गेल्याची माहिती मिळाली असून जोरदार पावसामुळे शेळ्या, मेंढ्या मृत पावल्या आहेत. तालुका प्रशासनाच्या वतीने येत्या चोवीस तासात पुन्हा अतिवृष्टी होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. नदी काठच्या गावांना सतर्क राहण्याच्या सुचना प्रशासनाने वतीने देण्यात आल्या आहेत.
आमदार मोनिका राजळे यांनी प्रशासकीय यंत्रणेला सतर्क राहण्याचे आदेश दिले असून तहसीलदार अर्चना पागिरे, गट विकास अधिकारी महेश डोके हे पूरग्रस्त गावांना भेटी देऊन परिस्थितीचा आढावा घेत आहेत. भेटी दरम्यान नागरिकांना सुरक्षित राहण्याच्या सुचना देण्यात येत आहे.