मुंडे यांना साश्रूपूर्ण श्रध्दांजली
By Admin | Updated: June 4, 2014 00:15 IST2014-06-04T00:02:31+5:302014-06-04T00:15:07+5:30
अहमदनगर : ठिकठिकाणच्या वार्ताहरांकडून : केंद्रीय ग्रामविकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती निधनाबद्दल जिल्ह्यात ठिकठिकाणी बंद पाळून त्यांना आदरांजली वाहण्यात आली.

मुंडे यांना साश्रूपूर्ण श्रध्दांजली
अहमदनगर : ठिकठिकाणच्या वार्ताहरांकडून : केंद्रीय ग्रामविकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती निधनाबद्दल जिल्ह्यात ठिकठिकाणी बंद पाळून त्यांना आदरांजली वाहण्यात आली. कर्जतमध्ये मूक फेरी कर्जत : कर्जत येथे मूक फेरी काढून बाजारतळावर मुंडे यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. फेरीत सर्वपक्षीय कार्यकर्ते व व्यापारी सहभागी झाले होते. तालुक्याच्यावतीने आरएसएसचे तालुका कार्यवाह भालचंद्र कुलथे यांनी मुंडे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. जि.प. सदस्य राजेंद्र फाळके, प्रवीण घुले, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस नामदेव राऊत, अॅड. बाळासाहेब शिंदे, नितीन धांडे, अशोक खेडकर, सेनेचे तालुका प्रमुख बळीराम यादव, रिपाइंचे तालुकाध्यक्ष संजय भैलुमे व इतर मान्यवरांनी मुंडे यांना श्रध्दांजली अर्पण केली. शेवगावमध्ये बंद शेवगाव : शेवगाव येथे बंद पाळून मुंडे यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. तालुक्यातील बोधेगाव, बालमटाकळी, चापडगाव भागात कडकडीत बंद पाळून मुंडे यांना आदरांजली वाहण्यात आली. पाच जून रोजी शेवगाव येथे आदरांजली सभा आयोजित करण्यात आली असल्याचे जि.प. सदस्य अशोक आहुजा, भाजपा युवक मोर्चाचे माजी जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांनी दिली. ढोरजळगाव गावात बंद पाळून शोक व्यक्त करण्यात आला. मुंडे यांच्या निधनाने राजकारण व समाजकारणातमोठी पोकळी निर्माण झाली असल्याची भावना गावकर्यांनी व्यक्त केली. करंजी भागात बंद करंजी : करंजीसह चिचोंडी, कोल्हार, पांढरीपूल येथे कडकडीत बंद पाळून श्रध्दांजली वाहण्यात आली. सेनेचे ज्येष्ठ नेते मोहन पालवे यांनी मुंडे यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले. या भागातील अनेक कार्यकर्ते परळीकडे मुंडे यांच्या अंत्यविधीसाठी रवाना झाले आहेत. मिरीत श्रध्दांजली मिरी : पाथर्डी तालुक्यातील मिरी ग्रामस्थांच्यावतीने गोपीनाथ मुंडे यांना भावपूर्ण श्रध्दांजली वाहण्यात आली. ज्येष्ठ नेते विजय कुटे यांनी मुंडे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते कारभारी गवळी, रमेश मिरपगार, आदिनाथ वाघ, बंडोपंत झाडे, ग्रामस्थ हजर होते. मोठे संकट - ताके नेवासा : भाजपा नेते गोपीनाथ मुंडे यांच्या निधनाने पक्षाच्या माध्यमातून संघर्ष करणारा सच्चा मित्र हरपला आहे. पक्षावर मोठे संकट आले आहे, अशा शब्दात भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते दिनकर ताके यांनी मुंडे यांना श्रध्दांजली अर्पण केली. (तालुका प्रतिनिधी, वार्ताहर)तिसगाव : केंद्रीय ग्रामविकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांना वृध्देश्वर साखर कारखाना कार्यस्थळावर श्रध्दांजली वाहण्यात आली. शोकसभेनंतर कारखान्यातील कामकाज दिवसभर बंद ठेवण्यात आले. कारखान्याचे कार्यकारी संचालक जालिंदर पवार, उपाध्यक्ष रामकिसन काकडे यांनी मुंडे यांंच्या कार्यकर्त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. कामगार संघटनेचे अध्यक्ष रामनाथ गरड, सरव्यवस्थापक भास्कर गोरे, कारखान्याचे सरव्यवस्थापक भास्कर गोरे, विभाग प्रमुख, कामगार हजर होते. तिसगावमधील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद ठेऊन मुंडे यांना आदरांजली वाहण्यात आली. ‘मुळा’वर शोकसभा सोनई : मुळा साखर कारखाना, मुळा बाजार, मुळा एज्युकेशन सोसायटीच्या मध्यवर्ती कार्यालयासह महाविद्यालय, यश मल्टीस्टेट बँक, यशवंत वाचनालय, नेवासा तालुका दूध संघातर्फे गोपीनाथ मुंडे यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. यावेळी येथील कामकाज बंद ठेवण्यात आले. आमदार शंकरराव गडाख यांनी मुळा कारखान्यावर शोकसभेचे आयोजन केले होते. यावेळीे जि.प. सदस्य सुनील गडाख यांचे श्रध्दांजलीपर भाषण झाले. शनैश्वर देवस्थान, राष्ट्रवादी काँग्रेस, पोलीस पाटील संघटना, बाजार समिती, यशवंत प्रतिष्ठान, सोनई सोसायटी, ग्रामपंचायत येथेही मुंडे यांना श्रध्दांजली वाहण्यात आली.