शंकरराव घुले यांचे निधन

By Admin | Updated: May 6, 2016 18:40 IST2016-05-06T18:34:21+5:302016-05-06T18:40:39+5:30

अहमदनगर : महाराष्ट्र हमाल माथाडी पंचायतीचे प्रदेश उपाध्यक्ष व माजी नगराध्यक्ष शंकरराव घुले (वय ६४)यांचे गुरूवारी सकाळी (दि.५) हृदयविकाराने निधन झाले.

Shankarrao Ghule passes away | शंकरराव घुले यांचे निधन

शंकरराव घुले यांचे निधन

अहमदनगर : महाराष्ट्र हमाल माथाडी पंचायतीचे प्रदेश उपाध्यक्ष व माजी नगराध्यक्ष शंकरराव घुले (वय ६४)यांचे गुरूवारी सकाळी (दि.५) हृदयविकाराने निधन झाले. स्व. घुले यांच्या पार्थिवदेहावर सायंकाळी नगर येथील स्मशानभूमित अंत्यसंस्कार करण्यात आले. आपल्या नेत्याला निरोप देताना हमाल माथाडी आणि कामगार वर्गाला अश्रू अनावर झाले.
नगर-औरंगाबाद रस्त्यावरील फार्म हाऊसवर घुले हे वास्तव्यास होते. नेहमीप्रमाणे सकाळी उठून ते व्यायामासाठी बाहेर पडले होते. वेळ उलटूनही ते आले नाहीत म्हणून त्यांचा मुलगा त्यांना पाहण्यासाठी बंगल्याच्या पाठीमागील बाजूस गेला. तेथे घुले हे जमिनीवर कोसळल्याचे दिसून आले. तातडीने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दुर्दैवाने उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाले. घुले यांच्या निधनाचे वृत्त समजताच विविध राजकीय पक्षाचे नेते, हमाल पंचायतीचे सदस्य व नागरिकांनी रुग्णालयाकडे धाव घेतली.
शवविच्छेदनानंतर त्यांचे पार्थिव फार्म हाऊसमधील बंगल्यावर नेण्यात आले. तेथून हमाल पंचायत येथे नागरिकांच्या अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. सायंकाळी पारगल्ली येथील जुन्या घरापासून अंत्ययात्रा काढण्यात आली. रिक्षा चालकांनी बंद ठेवून घुले यांना आदरांजली वाहिली. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, सून, तीन भाऊ, बहिणी, पुतणे असा मोठा परिवार आहे. अंत्यसंस्काराच्या वेळी आमदार शिवाजी कर्डिले, आ. अरुणकाका जगताप, आ. संग्राम जगताप, माजी आमदार दादा कळमकर, महापौर अभिषेक कळमकर, सेनेचे शहराध्यक्ष संभाजी कदम, कॉम्रेड बाबा आरगडे, नितीन पवार, नवनाथ बिनवडे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
शंकरराव घुले यांचा जीवनपट
१२ जून १९५२ रोजी शंकरराव घुले यांचा जन्म झाला. नववीपर्यंत शिक्षण झाले होते. सलग २५ वर्षे ते नगरसेवक होते. १९८५ ते १९९१ पर्यंत त्यांनी नगराध्यक्ष पद भूषविले. त्यांच्या काळात नगर शहरासाठी पाणी पुरवठा करणारी तिसरी पाईपलाईन कार्यान्वित केली. आकाशवाणी केंद्र व दूरदर्शन केंद्राला नगरपालिकेची जागा दिली. पालिकेची रक्तपेढी, वाडिया पार्क स्टेडियमचा दुसरा टप्पा, शहरात विक्रीसाठी येणाऱ्या फळे,भाजीपाला यांना जकात माफी, शहराच्या विविध भागात पालिकेची रुग्णालये यासारखी अनेक महत्त्वपूर्ण कामे घुले यांच्या कारकिर्दीत झाली. पिंपळगाव माळवी येथे नगरपालिकेच्या माध्यमातून जनावरांसाठी छावणी सुरू केली होती. १९८१ पासून हमाल पंचायतच्या अध्यक्षपदाची धुरा खांद्यावर घेत कष्टकरी हमाल कामगारांच्या प्रश्नांसाठी आजतागायत झटत राहिले. १९९५ मध्ये शहर विधानसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढविली होती. १९९९ मध्ये श्रमिक हॉस्पिटल त्यांनी उभारले. शहर सहकारी बॅँकेचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते. राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी त्यांचे सलोख्याचे संबंध होते.

Web Title: Shankarrao Ghule passes away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.