शिवसंग्रामच्या सात जणांना अटक व सुटका
By Admin | Updated: June 24, 2014 00:03 IST2014-06-23T23:33:45+5:302014-06-24T00:03:17+5:30
अहमदनगर : मराठा आरक्षण देण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कोणतीही परवानगी न घेता मंत्री नारायण राणे यांचा पुतळा जाळून उग्र आंदोलन करून

शिवसंग्रामच्या सात जणांना अटक व सुटका
अहमदनगर : मराठा आरक्षण देण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कोणतीही परवानगी न घेता मंत्री नारायण राणे यांचा पुतळा जाळून उग्र आंदोलन करून तसेच जिल्हाधिकारी यांच्या जमावबंदी आदेशाचा भंग केल्या प्रकरणी शिवसंग्राम पक्षाच्या अध्यक्षासह सात जणांवर गुन्हे दाखल करून पोलिसांनी अटक केली. त्यांना सायंकाळी जामिनावर मुक्त करण्यात आले.
मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी शिवसंग्राम पक्षातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. या आंदोलनाची कोणतीही परवानगी पक्षाने घेतली नव्हती. तसेच जिल्हाधिकारी यांचा जमावबंदी आदेश सुरू असताना आंदोलन करण्यात आले.
आंदोलकांनी मंत्री नारायण राणे यांच्या प्रतिकात्मक पुतळ््याचे दहन केले. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्याच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी शिवसंग्राम पक्षाच्या सात जणांना ताब्यात घेतले.
पोलीस कर्मचारी जगदीश पोटे यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. यावरून सात जणांना अटक केली. नवनाथ हरिश्चंद्र इसरवाडे (अध्यक्ष, शिवसंग्राम पक्ष, रा. शेवगाव), बाळासाहेब देशमुख (रा. हादगाव, ता. शेवगाव), अंबादास नवनाथ नागरे (रा. शेवगाव), ज्ञानेश्वर नंदू अभंग (रा. हादगाव), नामदेव भिवसेन डोईफोडे (रा. शेवगाव), भानुदास शिवाजी मडके, दिलीप एकनाथ भागवत (रा. एरंडगाव, ता. शेवगाव) यांना अटक करून कोतवाली पोलीस ठाण्यात आणले. या प्रकरणी दोषारोपपत्र निश्चित करून ते न्यायालयात सादर केल्यानंतर समक्ष हजर राहावे, अशी अट घालून सर्वांची पोलिसांनी जामिनावर मुक्तता केली.
पोलीस नाईक विकास खंडागळे, हेड कॉन्स्टेबल भुजबळ, अजय गव्हाणे, संतोष ओहळ यांनी आंदोलकांना ताब्यात घेतले होते. पोलीस निरीक्षक बाळकृष्ण हनपुडे यांच्या आदेशावरून ही कारवाई करण्यात आली. प्रतिकात्मक पुतळा दहन करण्यासाठी आंदोलकांनी कोणतीही परवानगी घेतली नव्हती. तसेच सध्या जिल्हाधिकारी यांचा जमावबंदी आदेश सुरू असल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे हनपुडे यांनी सांगितले.
(प्रतिनिधी)