कर्जत : कर्जत नगरपंचायतीत आमदार रोहित पवार यांना आणखी एक धक्का बसला आहे. येथील गटनेता-उपगटनेता पूर्वीचाच कायम राहणार आहे. पवार गटाकडून गटनेता-उपनगटनेता बदलाची केलेली मागणी जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळली आहे. त्यामुळे नगरसेवक संतोष मेहेत्रे हे गटनेते आणि उपगटनेते म्हणून सतीश पाटीलच कायम राहणार आहेत.
रोहित पवार गटाकडून गटनेतेपदासाठी अमृत काळदाते आणि उपगटनेत्या म्हणून प्रतिभा भैलुमे यांचे नाव पुढे करण्यात आले होते. उषा राऊत यांच्या राजीनाम्यानंतर पुढील नगराध्यक्षा कोण होणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. त्यातच आता दोन्ही बाजूंनी डावपेच टाकण्यास सुरुवात झाली आहे. १८ फेब्रुवारी २०२२ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्ष काँग्रेस यांनी निवडून आलेल्या १५ नगरसेवकांनी एकत्र येत गटनेते म्हणून संतोष मेहेत्रे आणि उपगटनेते म्हणून सतीश पाटील यांची निवड केली होती. मात्र यातील ११ जणांनी त्यातून बाहेर पडत आपली वेगळी चूल मांडली. तत्कालीन नगराध्यक्षा उषा राऊत यांच्याविरोधात अविश्वास ठराव मांडला. त्यामुळे ११ विरुद्ध ४ असा पेच निर्माण झाला. यात भाजपचे दोन्ही सदस्य या ११ नगरसेवकांबरोबर असल्याने यात आणखी भर पडली आहे.
आमदार पवार यांनी पुढील नगराध्यक्षा निवडणुकीत कायदेशीर पेच निर्माण करीत गटनेता बदलण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या. या चार नगरसेवकांमधून अमृत काळदाते यांची गटनेता, तर प्रतिभा भैलुमे यांची उपगटनेत्या म्हणून नोंदणी करीत पूर्वीच्या निवडीला आव्हान दिले होते. मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही. अखेर अगोदरच्याच निवडी जिल्हाधिकारी यांनी योग्य असल्याचे म्हटले आहे.
व्हिप नाकारल्यास अपात्रतेची कारवाईया प्रकरणाची जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्याकडे शुक्रवारी सुनावणी झाली. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकत जिल्हाधिकारी यांनी पूर्वीच्याच निवडी कायम राहतील असा निर्णय दिला. नव्याने बदलाची मागणी जिल्हाधिकारी यांनी फेटाळून लावली. त्यामुळे आमदार रोहित पवारांना हा एक धक्काच मानला जात आहे. २ मे रोजी नगराध्यक्षा निवडीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. गटनेते म्हणून संतोष मेहेत्रे यांचा व्हिप त्या १५ नगरसेवकांना लागू होणार आहे. काही नगरसेवकांनी व्हिप नाकारल्यास त्यावर अपात्रतेची कारवाई होण्याची दाट शक्यता आहे.
स्वाक्षरीपत्रावर आमच्या सह्याच नाहीतआमदार रोहित पवार गटाने २६ मार्चला सर्व नगरसेवकांची बैठक घेतली होती. त्यांनी गटनेता म्हणून अमृत काळदाते आणि उपगटनेत्या म्हणून प्रतिभा मैलुमे यांची निवड झाल्याचे सर्व नगरसेवकांच्या स्वाक्षरीसह दाखल केले होते. त्याची नोंद जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अभिलेखावर घ्यावी, अशी विनंती 3 केली होती. त्यांच्या विरोधी गटाने २६ मार्चलाच राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाची कोणतीही बैठक झाली नसल्याचा खुलासा जिल्हाधिकारी यांच्याकडे केला. १७ एप्रिल रोजीचा अर्जच मुदतबाह्य असून त्यांनी दाखल केलेल्या 3 स्वाक्षरीपत्रावर आमच्या सह्याच नाहीत, असे स्पष्टीकरण ११ नगरसेवकांनी दिले. त्यामुळे दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकल्यानंतर आणि त्याची सत्यता पडताळणी करीत जिल्हाधिकारी यांनी पूर्वीच्याच निवडी ग्राह्य ठेवत बदलाची मागणी फेटाळून लावली.