लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपळगाव माळवी : नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी येथील तलावाशेजारी टेंभी डोंगरावर परिसरातील ज्येष्ठ नागरिकांनी मागील वर्षी वडाची ४० झाडे लावून त्यांची वेळोवेळी निगा राखून ती जगवली आहेत.
पिंपळगाव माळवी येथील टेंभी डोंगरावर पुरातन शिवकालीन खंडोबा मंदिर आहे. हे मंदिर देखभालीअभावी जीर्णावस्थेला पाेहाेचले हाेते. पंचक्रोशीतील धनगरवाडी, शेंडी-पोखर्डी, पिंपळगाव, वडगाव, जेऊर येथील युवकांनी तीन वर्षांपूर्वी लोकवर्गणीतून मंदिराकडे जाण्यासाठी रस्ता व या मंदिराचा जीर्णोद्धार करून हे मंदिर एक धार्मिक पर्यटन स्थळ म्हणून नावारुपास आणले. त्यामुळे या परिसरातील ज्येष्ठ नागरिक, युवक या टेकडीवर मॉर्निंग वॉकला येऊ लागले. त्यातूनच शेंडी पोखर्डी येथील ज्येष्ठ नागरिक व अहमदनगर येथील किर्लोस्कर ग्रुप यांनी मागील वर्षी या टेकडीवर चाळीस वटवृक्षांचे रोपण केले. त्यामुळे या टेकडीचे एकप्रकारे पर्यावरण संतुलन राखले गेले. वेळोवेळी या ज्येष्ठ नागरिकांनी स्वखर्चाने टँकरने या झाडांना पाणी घालून ही झाडे जगवली आहेत. आज हे चाळीस वटवृक्ष दिमाखात उभे असून, या टेकडीला एकप्रकारे गतवैभव प्राप्त झाले आहे.
--
१८ पिंपळगाव माळवी
टेंभी डोंगरावरील वटवृक्षांना पाणी देताना ज्येष्ठ नागरिक.