विकासकामांचे प्रस्ताव पाठवा मंजुरी आणतो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:23 IST2021-07-14T04:23:50+5:302021-07-14T04:23:50+5:30
टाकळीमानूर : कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होता. त्यामुळे सुरक्षिततेसाठी आजपर्यंत आलो नाही. मनात प्रचंड अस्वस्थता होती. सगळ्यांना भेटण्याची इच्छा ...

विकासकामांचे प्रस्ताव पाठवा मंजुरी आणतो
टाकळीमानूर : कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होता. त्यामुळे सुरक्षिततेसाठी आजपर्यंत आलो नाही. मनात प्रचंड अस्वस्थता होती. सगळ्यांना भेटण्याची इच्छा होतीच. पण काही निर्बंध स्वतःहून घालून घेतले होते आणि शांत बसलो. दीड वर्षात विकासकामांना संथ गती मिळाली. मात्र आता आघाडी सरकारने त्यास मान्यता दिली. त्यासाठी तुम्ही प्रस्ताव पाठवा मंजुरी आणतो, अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस ॲड. प्रताप ढाकणे यांनी दिली.
शनिवारी सकाळी ढाकणे यांनी पाथर्डी तालुक्याच्या पूर्व भागातील वडगाव जोगेवाडी, चिंचपूर पांगूूळ, मानेवाडी, ढाकणवाडी त्या परिसराचा सांत्वन दौरा केला. त्यांनी यावेळी कोरोनाने मृत्यू झालेल्या विविध व्यक्तींच्या कुटुंबीयांच्या घरी भेटी दिल्या. यावेळी डॉ. राजेंद्र केरकर, अशोक ढाकणे, रावसाहेब ढाकणे, विष्णू ढाकणे, आबासाहेब पांगरे, आजिनाथ बडे, लक्ष्मण पांगरे, डॉ. अशोक बडे, सोमनाथ बडे, दादासाहेब बारगजे आदी उपस्थित होते.
यावेळी विविध गावातील ग्रामस्थांनी जोगेवाडी ते पाटसरा रस्ता दुरुस्ती करणे, ढाकणवाडी घाटातील रस्ता रूंदीकरण, दुरुस्ती, नवल पांगुळ ते वडगाव रस्ता दुरुस्ती, मानेवाडी येथील अंतर्गत पाणीपुरवठ्याची पाईपलाईन संदर्भात तक्रारी मांडल्या.
ढाकणे म्हणाले, परिसराचे माजी मंत्री बबनराव ढाकणे यांच्यावर प्रेम आहे. तेच तुम्ही मला दिले. तुमचे उपकार मी विसरू शकत नाही. त्यामुळे अगोदर आलो आहे. मानेवाडी, लाखनवाडी, पांगुळ, वडगाव जोगेवाडी गावातील मांडलेले प्रश्न राज्य सरकारच्या दरबारी पाठवणार आहोत. मंत्री धनंजय मुंडे, पालकमंत्री हसन मुश्रीफ व जिल्हा परिषदेच्या माध्यमातून तुमच्या सर्व समस्या सोडविण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
-----
१२ ढाकणे
वडगाव जोगेवाडी येथे गावकऱ्यांशी चर्चा करताना ॲड. प्रताप ढाकणे.