सलग दुसऱ्या दिवशी गारपीटीने झोडपले
By Admin | Updated: May 7, 2017 17:08 IST2017-05-07T17:08:43+5:302017-05-07T17:08:43+5:30
पारनेर तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी फळबागांना गारपिटीने झोडपले़

सलग दुसऱ्या दिवशी गारपीटीने झोडपले
आॅनलाईन लोकमत
अहमदनगर, दि़ ७ - जिल्ह्यातील श्रीगोंदा, पारनेर व नेवासा तालुक्यातील विविध गावांत रविवारी दुपारनंतर वादळी वाऱ्यासह झालेल्या जोरदार अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले़ पारनेर तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी फळबागांना गारपिटीने झोडपले़
श्रीगोंदा तालुक्यातील सारोळा सोमवंशी परिसरात दुपारी तीन वाजेच्या सुमारास जोरदार वादळी पाऊस झाला. गारांचे प्रमाण जास्त असल्याने डाळिंबांसह फळबागांचे मोठे नुकसान झाले. अगोदरच शेतमालाला भाव नसल्याने अडचणीत असणारे शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले आहे. पावसाने ताली भरल्याने जमिनीत गारवा निर्माण झाला आहे. शेजारी असणारे कोरेगव्हाण, निंबवी, विसापूर, चांभुर्डी आदी गावांत हलका पाऊस झाला़
पारनेर तालुक्यातील निघोज, वडनेर, कान्हुरपठार, पाडळी दर्या, काळेवाडी, सुपा येथे दुपारी अडीच ते तीन वाजेदरम्यान वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला़ गारपीट व वादळाने या गावांमधील डाळींब, कलिंगड, आंबा, मोसंबी, संत्रा, खरबुज, द्राक्षे या फळबागांना कोट्यवधी रूपयांचा फटका बसला आहे़