भाजपा प्रबळ उमेदवाराच्या शोधात

By Admin | Updated: June 18, 2014 01:23 IST2014-06-18T00:42:52+5:302014-06-18T01:23:11+5:30

विजय भंडारी, नेवासा मतदारसंघात विधानसभा निवडणुकांचे वेध लागले असून राजकीय घडामोडीही गतिमान झाल्या आहेत. लोकसभा निवडणुकीतील मोदी लाटेचा फायदा होईल

In search of BJP strong candidate | भाजपा प्रबळ उमेदवाराच्या शोधात

भाजपा प्रबळ उमेदवाराच्या शोधात

विजय भंडारी, नेवासा
मतदारसंघात विधानसभा निवडणुकांचे वेध लागले असून राजकीय घडामोडीही गतिमान झाल्या आहेत. लोकसभा निवडणुकीतील मोदी लाटेचा फायदा होईल, या आशेने भाजपा प्रवेश व पक्षाची उमेदवारी मिळविण्यासाठी अनेक इच्छुकांनी देव पाण्यात घातले आहेत. मागील विधानसभा निवडणुकीतील भाजपाचे उमेदवार विठ्ठलराव लंघे यांनी पक्षाला ‘जय श्रीराम’ करीत राष्ट्रवादीत प्रवेश केला़ त्यानंतर तालुक्यात भाजपामध्ये मोठी मरगळ आली होती. मात्र मोदी लाटेनंतर या पक्षात प्रवेशासाठी इच्छुकांची झुंबड उडाली आहे.
मतदारसंघ पुनर्रचनेत नेवासा तालुक्याचा एकसंध मतदारसंघ झाला़ या मतदारसंघावर राष्ट्रवादीचे वर्चस्व राखण्यात आमदार शंकरराव गडाख गटाने बाजी मारली. मोदी लाटेमुळे अनेकांच्या राजकीय महत्त्वाकांक्षा जाग्या झाल्या आहेत. श्रीरामपूर तालुक्याचे माजी आमदार भानुदास मुरकुटे, नेवासा तालुका काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब मुरकुटे, जिल्हा परिषद सदस्य दिलीपराव वाकचौरे, घोडेगाव येथील युवक नेते सचिन देसर्डा, माजी आमदार तुकाराम गडाख भाजपाच्या उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. यातील बहुतांशी इच्छुक उमेदवारांना स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी उमेदवारीचा शब्द दिला होता. त्यांच्या निधनाने या इच्छुकांच्या पक्ष प्रवेशाला सध्या तरी ‘खो’ बसला आहे. या तालुक्याचे आ. शंकरराव गडाख यांनी मतदारसंघात केलेली कामे, शेतीसाठी पाणी व पिण्याच्या पाण्यासाठी वेळप्रसंगी शासन विरोधी भूमिका घेतली़ जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विठ्ठलराव लंघे व तालुक्यात महिला बचत गटाचे नेतृत्व करणाऱ्या सुनीताताई गडाख यांच्या संपर्कामुळे आजमितीस राष्ट्रवादी आणि पर्यायाने गडाख प्रबळ दावेदार समजले जातात.
तालुक्यात मनसेचे रोपटेही चांगलेच बाळसे धरु लागले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संभाव्य उमेदवार दिलीपराव मोटे यांनीसुद्धा दीड वर्षापासून संपूर्ण तालुका पिंजून काढला आहे. त्याचबरोबर सेनेचे तालुका अध्यक्ष हरिभाऊ शेळके, जिल्हा संघटक रामदास गोल्हार यांनीसुद्धा या मतदारसंघावर आपला हक्क सांगत विधानसभेची ही जागा सेनेला मिळावी ही आग्रही भूमिका मांडली आहे. भाजपाची उमेदवारी आपल्यालाच मिळेल या कल्पनेने गेल्या वर्षभरापासून भाजपा कार्यकर्त्यांसह तालुक्याचा दौरा करणारे भाजपाचे अजित फाटके हे सुद्धा आपली उमेदवारी निश्चित असल्याचे सांगत आहेत.
या सर्व घडामोडी लक्षात घेता नेवासा विधानसभा मतदारसंघातील निवडणूक चुरशीची होणार आहे. या मतदारसंघात एकास एक उमेदवार देण्याचे मोठे आव्हान विरोधी पक्षांसमोर आहे़ भाजपाला उमेदवारी देताना सशक्त उमेदवार शोधावा लागेल. असा तगडा उमेदवार बाहेरील मतदारसंघातील असू शकतो. तसे झाले तर लढत चुरशीची होऊ शकते.
राष्ट्रवादीशंकरराव गडाख  ९१४२९
भाजपाविठ्ठलराव लंघे  ६९९४३
अपक्षतुकाराम गडाख  ५१६६
इच्छुकांचे नावपक्ष
शंकरराव गडाख  राष्ट्रवादी
भानुदास मुरकुटे  भाजपा
बाळासाहेब मुरकुटे ....
दिलीपराव मोटे  मनसे
हरिभाऊ शेळके  शिवसेना
लोकसभा निवडणुकीत
सदाशिव लोखंडे यांना ५१ हजारांचे मताधिक्य

Web Title: In search of BJP strong candidate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.