मध्यप्रदेशातील इंदरगढ येथून येतात कट्टे
By Admin | Updated: July 23, 2014 00:15 IST2014-07-22T23:10:37+5:302014-07-23T00:15:32+5:30
अहमदनगर : मध्यप्रदेशातील आलमगढ पासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या इंदरगढ येथून गावठी कट्टे खरेदी करून ते महाराष्ट्रात आणून विकणारी टोळी हाती लागली आहे.
मध्यप्रदेशातील इंदरगढ येथून येतात कट्टे
अहमदनगर : मध्यप्रदेशातील आलमगढ पासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या इंदरगढ येथून गावठी कट्टे खरेदी करून ते महाराष्ट्रात आणून विकणारी टोळी पोलीस उपविभागीय अधिकारी वाय. डी. पाटील यांच्या विशेष पथकाच्या हाती लागली आहे. या पथकातील पोलिसांनी पुणे येथे आणखी तीन जणांना तीन गावठी कट्ट्यासह अटक केली आहे. दीड ते दोन हजार रुपयांना एक कट्टा विकत घेऊन तो पाच ते दहा हजार रुपयांना विकला जातो. अशा कट्ट्यांचा व्यापार करणारी टोळीच पोलिसांच्या हाती लागली आहे.
केडगाव येथील पेट्रोल पंपावर अडीच हजार रुपयांचे डिझेल भरून, गोळीबार करून दहशत करणाऱ्या मध्यप्रदेशातील भिंड येथील चौघांना पोलिसांनी एक तासामध्येच अटक केली होती. सध्या ते पोलीस कोठडीची हवा खात आहेत. कृपालसिंग मानराजसिंग गुजर, बंटी उर्फ राघवेंद्र आजमेरसिंग राजपूत, रवी भगवानदास शर्मा, अमीर समील बेग (सर्व रा. भिंड,मध्यप्रदेश) अशी त्या आरोपींची नावे होती. त्यांच्याकडे सात जिवंत काडतुसांसह तीन गावठी कट्टे आढळून आले होते. चौघांपैकी कृपालसिंग आणि रवी हे ग्वाल्हेरचे रहिवाशी आहेत, तर अमीर आणि बंटी हे आलमपूरचे रहिवाशी आहेत. पोलीस कोठडीमध्ये त्यांनी गावठी कट्टे कोठून खरेदी केले जातात, याची माहिती दिली. मध्यप्रदेशातील आलमगढ येथील इंदरगढ येथे के.डी. यादव यांच्याकडे गावठी कट्टे विक्रीचा व्यापार आहे. तेच कट्टे पुरवितात, असे या चौघांनी सांगितले. मध्यप्रदेशातून कट्टे आणून ते पुण्यात विक्री करीत असल्याची माहितीही दोघा आरोपींनी दिली. त्यानुसार पुण्यात तपासासाठी गेलेल्या पोलीस पथकाने आणखी तीन संशयितांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे. त्यांच्याकडून आणखी तीन कट्टे जप्त करण्यात आली आहेत. ते सध्या संशयित असून त्यांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात येत आहे. त्यामुळे कमी किमतीत खरेदी करून जास्त भावाने कट्टे विकणारी सात जणांची टोळी कार्यरत असल्याची पोलिसांची खात्री झाली आहे. त्यांनी नगरमध्ये, महाराष्ट्रात कुठे कुठे कट्टे विकले,याचे धागेदोरे हाती येणार असल्याने मोठे रॅकेट पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)