वाघुंडे, वाडेगव्हाणची विद्यालये विद्यार्थ्यांच्या उपस्थितीने गजबजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:19 IST2021-07-25T04:19:26+5:302021-07-25T04:19:26+5:30
सुपा : पारनेर तालुक्यातील सुपा परिसरातील वाघुंडे येथील बाळानंद स्वामी विद्यालय, गुरुदेव विद्यालय, वाडेगव्हाण येथील प्रभू विद्यालय, रांजणगावचे शिवाजी ...

वाघुंडे, वाडेगव्हाणची विद्यालये विद्यार्थ्यांच्या उपस्थितीने गजबजली
सुपा : पारनेर तालुक्यातील सुपा परिसरातील वाघुंडे येथील बाळानंद स्वामी विद्यालय, गुरुदेव विद्यालय, वाडेगव्हाण येथील प्रभू विद्यालय, रांजणगावचे शिवाजी विद्यालय अशी चार विद्यालये सुरू झाली आहेत. ही चार विद्यालये विद्यार्थ्यांच्या उपस्थितीने गजबजली आहेत.
स्थानिक पातळीवरील ग्रामपंचायत व शिक्षण विभागाने शाळा सुरू करण्यास परवानगी दिल्याने विद्यार्थ्यांचे ऑफलाईन शिक्षण सुरू झाले. त्यामुळे मुले शाळेत दाखल झाली व वातावरण पार बदलून गेले. गेल्या सव्वावर्षापासून कोरोनाच्या प्रादुर्भावापासून दूर राहण्यासाठी शाळा बंद ठेवल्याने विद्यार्थ्यांविना भकास दिसणाऱ्या शालेय वातावरणात चैतन्य निर्माण झाल्याचे ग्रामस्थ, पालक, शिक्षकांनी सांगितले. ज्या गावात महिनाभरात एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडला नाही, अशा गावांतील ग्रामपंचायत व त्यांच्या समितीने शिफारस केल्यास तेथील शाळा सुरू करण्यास शिक्षण विभागाकडून परवानगी दिली जाते, अशी माहिती गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब बुगे यांनी सांगितली. परंतु, त्यासाठी काही गोष्टींची खबरदारी शालेय प्रशासनाला घ्यावी लागणार आहे. सॅनिटायझर, मास्कचा वापर, तापमान मोजणे, गर्दी टाळणे त्यासाठी अंतर ठेवण्यास विद्यार्थ्यांना सूचना देणे याबाबी अंतर्भूत असल्याचे सांगितले.
रांजणगाव मशीद येथे शुक्रवारी (दि. २३) पाच पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने सुरू करण्यात आलेली शाळा पुन्हा बंद करण्याबाबत ग्रामपंचायतीने शालेय प्रशासनाला कळविल्याचे सरपंच बंटी साबळे व राहुल पाटील शिंदे यांनी सांगितले. रांजणगाव येथील रुग्णसंख्या घटविण्यात प्रयत्न केल्याने गावात एकही पॉझिटिव्ह रुग्ण नव्हता. त्यामुळे १९ जुलैपासून शाळा सुरू करण्यास परवानगी दिली होती. पुढील चारच दिवसांत कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्याबाबत ग्रामपंचायतीने पत्र दिल्याचे सरपंच बंटी साबळे व राहुल शिंदे यांनी सांगितले. वाघुंडे येथील श्री बाळानंद स्वामी विद्यालय १५ जुलैपासून सुरू करण्यात आल्याचे विद्यालय समितीचे अध्यक्ष संदीप मगर यांनी सांगितले.
वाडेगव्हाण येथील शाळा सुरू करताना खरोखरच खूप आनंद झाल्याचे सरपंच बाळासाहेब सोनवणे, युवक कार्यकर्ते अमोल यादव, कैलास सोनवणे यांनी सांगितले.
---
सुप्यात अधूनमधून कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडत असल्याने येथील तीन शाळांना सुरू करण्यासाठी अजून वाट पहावी लागेल. सध्या तरी ऑनलाईनद्वारेच मुलांना शिकविले जात आहे.
-बाळासाहेब बुगे,
गटशिक्षणाधिकारी, पारनेर
----
२४ वाघुंडे शाळा
वाघुंडे खुर्द येथील बाळानंद स्वामी विद्यालयात आल्यानंतर विद्यार्थ्यांचे तापमान तपासले जाते.