शाळकरी मुलीवर चाकूने जीवघेणा हल्ला; अज्ञात इसमावर केला गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2020 12:08 IST2020-06-28T11:59:25+5:302020-06-28T12:08:57+5:30
सहावीत शिकणा-या एका अल्पवयीन मुलीवर एका अज्ञात व्यक्तीने चाकूने वार करून गंभीर केले. ही घटना नेवासा तालुक्यातील गिडेगाव येथे शनिवारी दुपारी घडली.

शाळकरी मुलीवर चाकूने जीवघेणा हल्ला; अज्ञात इसमावर केला गुन्हा दाखल
नेवासा : सहावीत शिकणा-या एका अल्पवयीन मुलीवर एका अज्ञात व्यक्तीने चाकूने वार करून गंभीर केले. ही घटना नेवासा तालुक्यातील गिडेगाव येथे शनिवारी (दि.२७ जून) दुपारी घडली.
याबाबत अल्पवयीन मुलीने दिलेल्या जबाबात म्हटले आहे की, शनिवारी सकाळी दहा वाजता वडील, आई, चुलती मजुरीच्या कामावर गेले होते. त्यानंतर साडेबारा वाजता सदर मुलीचे चुलते ही कामावर गेले. दरम्यान भाऊ चुलत्यांच्या घरी खेळायला गेला. चुलत बहीण गवत आणण्यासाठी शेतात गेली. त्यानंतर पावणे एकच्या सुमारास ती घरातील फारशी पुसत असताना अचानक एका अज्ञाताने घरात घुसून तिच्या डोक्यावर चाकूने वार केले. त्यानंतर उजव्या व डाव्या हातावर तसेच तोंडावर, ओठावर वार केले. यावेळी ती ओरडल्याने त्याने तिचा गळा दाबला. तिने त्यास प्रतिकार केला. यात तिने त्याच्या हाताचा चावा घेतला. तेव्हा त्याने तिला सोडले. जाताना तो घराची कडी पळून गेला.
सदर अल्पवयीन मुलगी घटना घडल्यानंतर घरात मोठमोठ्याने ओरडत होती. त्यानंतर थोडा वेळाने चुलत बहीण घरी आल्यानंतर मुलीचे वडील व चुलते यांनी तिला उपचारासाठी नेवासा फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात आणले.
प्राथमिक उपचार करून सदर मुलीला पुढील उपचारासाठी अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिच्या जबाबावरून अज्ञात इसमाविरुद्ध जीवे ठार मारण्याचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.