शाळकरी मुले हातपंपावर!
By Admin | Updated: July 2, 2014 01:00 IST2014-07-02T00:43:50+5:302014-07-02T01:00:58+5:30
अहमदनगर : शहरात सलग तीन दिवस पाणी पुरवठा न झाल्याने शाळकरी मुलांना हातपंपाचा (हापसा) आधार घ्यावा लागला.

शाळकरी मुले हातपंपावर!
अहमदनगर : शहरात सलग तीन दिवस पाणी पुरवठा न झाल्याने शाळकरी मुलांना हातपंपाचा (हापसा) आधार घ्यावा लागला. हातपंपावरून पाणी भरून मुलांनी शाळेची तयारी केली. नोकरदारांनाही पाणी बंद असल्याचा फटका बसला. महिलाही पाण्याच्या शोधात भटकंती करत असल्याचे चित्र रविवारी, सोमवारी शहरात दिसून आले.
शहरात पाणी टंचाई जाणवण्याची चिन्हे आहेत. जिल्हा प्रशासनाकडून शहरातील पाणी कपातीचा विचार सुरू आहे. एकीकडे हा विचार सुरू असला तरी गळतीमुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे. ही गळती रोखण्यासाठीच्या उपाययोजनांकडे मात्र सगळ्यांचेच दुर्लक्ष झाले आहे. मुळा धरणातून सुपा एमआयडीसीतील पाईपलाईन जाते. या पाईपलाईनवर चासजवळ एक इंची कनेक्शन बेकायदा काढण्यात आले आहे. चोवीस तास त्यातून पाणी सुरू असते. त्याचा वापर धोबीघाटासारखा केला जात आहे. शहरातील पत्रकार चौकातही महापालिकेची पाणी पुरवठा योजनेची पाईपलाईन फुटली आहे. महिन्यापासून फुटलेल्या या लाईनमधून रोज लाखो लिटर पाणी गटारात जात आहे.
पाण्याचे दुर्भिक्ष्य शहरात असल्याने महिला, शालेय मुलांची तारांबळ उडत आहे. डोक्यावर पाण्याचे हंडे घेत महिला जीव धोक्यात घालून नगर-पुणे महामार्ग ओलांडतानाचे चित्र रविवारी दिसून आले. श्रमिकनगर येथे शालेय मुले हातपंपाचे पाणी घेऊन जात होते. पत्रकार चौकात फुटलेल्या पाईपलाईनवर पाणी भरण्यासाठी महिलांची गर्दी होत असल्याचे पहावयास मिळाले.