तमाशाऐवजी शाळा करणार डिजिटल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2017 21:04 IST2017-04-22T21:04:02+5:302017-04-22T21:04:02+5:30

भोयरे गांगर्डा यात्रेतील तमाशाला आणि अवास्तव खर्चाला फाटा देऊन गावची परिषदेची शाळा डिजिटल करण्यात येणार आहे.

School will be digital instead of fashion! | तमाशाऐवजी शाळा करणार डिजिटल!

तमाशाऐवजी शाळा करणार डिजिटल!

आॅनलाइन लोकमत
कानिफनाथ गायकवाड / पळवे (अहमदनगर), दि़ २२- पारनेर तालुक्यातील भोयरे गांगर्डा येथील ग्रामदैवत भैरवनाथ यात्रौत्सव २४ एप्रिलपासून सुरू होत आहे. यात्रेची तयारी पूर्ण झाली आहे. परंतु, यात्रेतील तमाशाला आणि अवास्तव खर्चाला फाटा देऊन गावची परिषदेची शाळा डिजिटल करण्यात येणार आहे. तसा निर्णय ग्रामस्थांनी ग्रामसभेतच घेतला आहे.
यात्रेच्या नियोजनासाठी गावात शनिवारी ग्रामसभा झाली. यावेळी सेवा सोसायटीचे संचालक आप्पासाहेब रसाळ, उपसरपंच दौलत गांगड, संदीप रसाळ, राजेंद्र रसाळ, सुभाष रसाळ, प्रदीप रसाळ यांनी शाळा डिजिटल करण्याचा प्रस्ताव मांडला. त्यास तरुणांसह ग्रामस्थांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका मंदा साबळे यांनी लोकसहभागातून शाळेचे दोन वर्ग याआधीच डिजिटल केले आहेत. त्यामुळे मुलांमध्ये शिकण्याची गोडी वाढली आहे. पहिली ते सातवीच्या शाळांमध्ये आणखी पाच वर्ग डिजिटल व्हावेत, अशी पालकांची इच्छा होती. तशी चर्चा ग्रामसभेत झाली आणि यात्रेच्या नियोजनाचा सूरच बदलला. प्रत्येक वर्ग डिजिटल झाल्याशिवाय यात्रेत कोणताही मनोरंजनावर खर्च न करण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला.
साधारणपणे दोनशे कुटुंबाच्या या गावात आधी प्रत्येक कुटुंबाकडून पाचशे ते एक हजार रुपये वर्गणी गोळा करण्याचा निर्णय झाला होता. मात्र शाळा डिजिटल करण्याचा निर्णय झाल्यानंतर ग्रामसभेतच काही गावकऱ्यांनी दुप्पट वर्गणी देण्याचा निर्णय घेतला आहे.
गावचा हा निर्णय अभिनंदीनीय आहे. संगणक- इंटरनेटच्या माध्यमातून मुले जगाशी संवाद साधण्यास सक्षम होणार असल्याचा आनंद आहे, अशी प्रतिक्रिया या निर्णयानंतर शाळेच्या मुख्याध्यापिका मंदा साबळे यांनी व्यक्त केली़
परिवर्तनाच्या वाटेवर यात्रा
यात्रेदरम्यान सुपा परिसरात रात्री करमणुकीसाठी कार्यक्रम आणण्याची परंपरा आहे. मोठा खर्च करुन तमाशा आणला जातो. एका तमाशासाठी एक ते सव्वा लाख रुपये सुपारी घेतली जाते. शाळा डिजीटल करण्यासाठी ८० हजार ते एक लाख रुपयांपर्यंत खर्च येतो. एक वर्ग डिजीटल होवू शकतो. ग्रामस्थांच्या या निर्णयामुळे यात्रा परिवर्तनाच्या वाटेवर गेली आहे.

Web Title: School will be digital instead of fashion!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.