कोविड सेंटर नव्हे जीवन सुंदर जगण्याची पाठशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:21 IST2021-05-18T04:21:48+5:302021-05-18T04:21:48+5:30

केडगाव : कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्याने नगर तालुक्याला मोठा हादरा दिला. तालुक्यात रुग्णसंख्या वाढत असताना बेडअभावी अनेक सर्वसामान्य रुग्णांची हेळसांड ...

A school to live a beautiful life, not a cowardly center | कोविड सेंटर नव्हे जीवन सुंदर जगण्याची पाठशाळा

कोविड सेंटर नव्हे जीवन सुंदर जगण्याची पाठशाळा

केडगाव : कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्याने नगर तालुक्याला मोठा हादरा दिला. तालुक्यात रुग्णसंख्या वाढत असताना बेडअभावी अनेक सर्वसामान्य रुग्णांची हेळसांड सुरू होती. अशा परिस्थितीत नगर बाजार समितीचे वाळुंज येथील कोविड सेंटर गोरगरिबांना वरदान ठरले. येथे फक्त कोरोनाचे उपचारच केले जात नाही तर जीवन सुंदर जगण्याचा परिपाठ शिकवला जातो. आतापर्यंत १७५ रुग्ण कोरोनावर मात करत येथून बाहेर पडले.

तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या १३ हजारांच्या पुढे गेली. अशावेळी सर्वसामान्य रुग्णांची हेळसांड सुरू होती. याचवेळी बाजार समितीने वाळुंज येथील रामसत्य कार्यालयात कोविड सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेतला. माजी आमदार शिवाजी कर्डिले, आमदार बबनराव पाचपुते यांच्या मार्गदर्शनाखाली सभापती अभिलाष घिगे, उपसभापती संतोष म्हस्के यांनी कोविड सेंटर सुरू केले. येथे शंभर बेडची व्यवस्था आहे. सध्या ७७ रुग्ण येथे दाखल असून १७५ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

येथील कोविड सेंटरमध्ये फक्त रुग्णांवर उपचारच केले जात नाहीत तर त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. जीवन किती सुंदर आहे याचा वस्तुपाठच येथे रुग्णाला शिकविला जातो. याचा सकारात्मक परिणाम होऊन रुग्ण कोणतीही धास्ती न घेता हसत खेळत कोरोनाशी दोन हात करत घरी सुखरूप परतत आहेत.

दररोज प्राणायम व योगाचे विविध प्रकार करून घेतले जातात. संगीताच्या सुरेल तालावर रुग्ण आपला आजार विसरत मोठ्या उत्साहाने यात सहभागी होतात. दिवसभर भजन, कीर्तन, प्रवचन असे धार्मिक कार्यक्रम घेतले जातात. यासोबत जीवनात सकारात्मक परिणाम व्हावा यासाठी नामांकित वक्त्यांची व्याख्याने, विनोदी कार्यक्रम, गाणी, कथाकथन असे वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची रेलचेल सुरू असते. बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांसह वाळूंज, शिराढोण, आसपासचे गावकरी मदतीचा हात पुढे करीत आहेत. सरपंच सुखदेव दरेकर, पंचायत समितीचे माजी सदस्य बाळासाहेब दरेकर, महेंद्र हिंगे यासारखे अनेक कार्यकर्ते घरचे कार्य समजून कोविड सेंटरमध्ये सेवा करीत आहेत. दररोज नाश्ता, अंडी, चहा, दुपारी, सायंकाळी जेवण दिले जाते. तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक दिवसातून दोनदा रुग्णांची तपासणी करतात.

---कोविड सेंटर सुरू करताना सर्वसामान्य रुग्णांना डोळ्यासमोर ठेवले. त्यांचे मनोबल वाढावे. जगण्याची उमेद निर्माण व्हावी यासाठी विविध प्रकारचे कार्यक्रम घेतले जातात. हसत हसत घरी जाणारे रूग्ण आमच्याही मनाला वेगळेच समाधान, आनंद देऊन जातात.

-अभिलाष घिगे,

सभापती, बाजार समिती, नगर

Web Title: A school to live a beautiful life, not a cowardly center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.