अहमदनगर : राज्यातील निचांकी तापमान (८ अंश) नगरला असतानाही कडाक्याच्या थंडीत भल्या सकाळीच शाळेची घंटा वाजते आहे. कुडकुडणाऱ्या थंडीत मुले व्हॅन, रिक्षा, स्कूल बसेस किंवा सायकलवरून जात आहेत. थंडीमध्ये मुले गारठली असताना शाळा, शिक्षण विभाग आणि शिक्षक संघटनांच्या संवेदनाही गारठल्या आहेत. किमान थंडीच्या दिवसात तरी मुलांच्या शाळेची वेळ सकाळच्याऐवजी दुपारी करण्याबाबत सर्वच स्तरावर उदासिनता आहे. यामुळे मुलांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.राज्यातील सर्वात निचांकी तापमान सध्या नगरला आहे. रोजच ७ ते ८ अंश सेल्सिअसपर्यंत तापमान खाली येते. त्यामुळे नगर पूर्णपणे गारठले आहे. अनेक शाळांच्या वेळा सकाळी ७ ते ७.१० तर काही शाळांच्या वेळा ७.४५ ते ८ अशा आहेत. ज्या मुलांची शाळा ७.१० वाजता आहे, त्या मुलांना सकाळी सात वाजताच बाहेर पडावे लागते. तर मुलांना घेण्यासाठी येणाºया रिक्षा, व्हॅन, स्कूल बसेस पावणे सात वाजताच दारात उभ्या असतात. ज्यांची शाळा ७.४५ ते ८ या वेळेला असते अशा शाळांच्याही व्हॅन, स्कूल बस, रिक्षा ७ ते ७.१५ दरम्यान दारात येतात. त्यामुळे ऐन कडाक्याच्या थंडीत मुलांना घराबाहेर पडावे लागते. शाळेचे वर्गही गारठलेले असतात. अशा कुडकुडणाºया थंडीत मुले काय शिकणार? याचा विचारही कोणाच्या मनात येऊ नये, हे दुर्दैव म्हणावे लागेल.उन्हाळा सुरू झाला तर शाळेची वेळ सकाळी करण्यासाठी शिक्षक संघटनांची धडपड सुरू असते. मात्र थंडीत शाळेची वेळ दुपारी करावी, याबाबत कोणीही धडपड करताना दिसले नाही.शिक्षक संघटनाही मूग गिळून गप्प आहेत. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागालाही कधी जाग येणार? असा प्रश्न पालक वर्गातून उपस्थित केला जात आहे. सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत शाळा का भरविल्या जात नाहीत? अनेक शाळांचे वर्ग दुपारी रिकामेच असतात. अशावेळी या वर्गामध्ये सकाळची शाळा दुपारी करण्याबाबत निर्णय घेतला जात नसल्याने मुलांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.जिल्हा परिषदेच्या शाळा सकाळी १०़३० वाजता भरतात़ त्यामुळे थंडीचा काही प्रश्न येत नाही़ या वेळेत बदलही होणार नाही़ उन्हाळ्यात हे बदल होतात़ खासगी शाळा त्यांच्या पातळीवर बदल करु शकतात.- रमाकांत काठमोरे, शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद
थंडीच्या कडाक्यात वाजते शाळेची घंटा : वेळापत्रक बदलण्यास शाळांचा नकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2018 18:44 IST