तिसगाव : चितळी (ता.पाथर्डी) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी गावचे भूमिपुत्र व औरंगाबाद येथील उद्योजक अशोक कारभारी आमटे यांची, तर उपसरपंचपदी सुवर्णा संतोष कदम यांची बिनविरोध निवड झाली.
निवडणूक निर्णय अधिकारी रखमाजी लांडे यांच्या अध्यक्षतेखाली नूतन सदस्यांची बैठक ग्रामपंचायत कार्यालयात झाली. सरपंचपदासाठी अशोक आमटे यांच्या नावाची सूचना आदिनाथ आमटे यांनी मांडली. दोन्ही पदांसाठी एकच अर्ज आल्याने अधिकाऱ्यांनी बिनविरोध निवडीची घोषणा केली. माजी आमदार स्व. राजीव राजळे, स्व. विठ्ठल कोठुळे यांच्या प्रतिमेस अभिवादन करून सरपंच आमटे यांनी पदभार स्वीकारला. स्व. ज्योती आमटे सर्व सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून स्वखर्चाने आमटे यांनी विविध शेतरस्ते त्यावरील सेतुपुलांची कामे केली. त्यातून ग्रामस्थांचा वाढता पाठिंबा मिळत राहिला. गावातील दोन पारंपरिक गट एकत्र आले. तरुणांना सोबत घेत तिसऱ्या आघाडीचा आमटे यांनी दिलेला तिसरा पर्याय स्वीकारला गेला. तिसऱ्या आघाडीला सहा जागांसह पूर्ण बहुमत मिळाले. सरपंचपदही खुले राहिले. त्यामुळे अशोक आमटे यांना सरपंचपदाची संधी मिळाली. यावेळी बाबासाहेब आमटे, ज्योती अशोक कुटे, आदिनाथ आमटे, सिंधूबाई अशोक ढमाळ आदी ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. ग्रामसेवक अश्विनी कटके यांनी आभार मानले.
फोटो : १४ अशोक आमटे, १४ सुवर्णा कदम