रोखपालाच्या कुटुंबीयांसाठी सरसावले पारनेरकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:22 IST2021-04-09T04:22:34+5:302021-04-09T04:22:34+5:30
टाकळी ढोकेश्वर : अपघाती निधन झालेल्या पारनेर तालुक्यातील जामगाव येथील बँकेतील रोखपालाच्या मदतीसाठी पारनेरकर सरसावले आहेत. विनोद पोपट सोबले ...

रोखपालाच्या कुटुंबीयांसाठी सरसावले पारनेरकर
टाकळी ढोकेश्वर : अपघाती निधन झालेल्या पारनेर तालुक्यातील जामगाव येथील बँकेतील रोखपालाच्या मदतीसाठी पारनेरकर सरसावले आहेत.
विनोद पोपट सोबले (वय २७) हे दहा दिवसांपूर्वी घरगुती कामासाठी चालले होते. जामगाव घाट येथे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने त्यांची गाडी रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडावर आदळली. गावातील लोकांनी तातडीने त्यांना उपचारासाठी दवाखान्यात नेले; परंतु उपचाराआधीच त्यांचे निधन झाले. मयत विनोद यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी व १ वर्षाची मुलगी असा परिवार आहे. ते पारनेर ग्रामीण पतसंस्थेच्या सुपा शाखेत रोखपाल म्हणून काम करत होते. पतसंस्था कर्मचारी संघटनेचे राज्य अध्यक्ष दत्तात्रय हांडे यांना ही दुर्घटना समजताच त्यांनी मयत विनोद यांच्या कुटुंबीयांना मदत करण्यासाठी प्रयत्न केले. सोशल मीडियावर असलेल्या पतसंस्था कर्मचारी संघटना या ग्रुपवर चर्चा केली व मदत करण्याचे आवाहन केले. केवळ ५ दिवसात ५२ हजार ८०० रुपयांची मदत जमा झाली. ही रक्कम विनोद यांच्या मुलीच्या नावाने दामतिप्पट योजनेत पावती केली आहे. ही पावती सहायक निबंधक सुखदेव सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निबंधक कार्यालयाचे अधिकारी वाघमोडे यांच्या हस्ते पारनेर ग्रामीण पतसंस्थेचे अध्यक्ष काशीनाथ दाते यांच्याकडे सुपुर्द करण्यात आली. यावेळी पतसंस्था कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष दत्तात्रय हांडे, लेखापरीक्षक अंकुश गुंजाळ, डी. एन. गायकवाड, अशोक वाळुंज, किरण खिलारी, संदीप जाधव, गंगाधर धावडे आदी उपस्थित होते.