संगमनेर तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्याकरिता शहरातील औषधांची दुकाने वगळता, अत्यावश्यक सेवेत येणारी सर्व दुकाने एक दिवसाआड सुरू ठेवण्यात येणार आहेत. संगमनेर व्यापारी असोसिएशनने हा निर्णय घेतला आहे. शुक्रवार (दि. १६) पासून हा निर्णय घेतला असून, शनिवारी (दि. १७) अत्यावश्यक सेवेतील सर्व दुकाने बंद होती. त्यामुळे शहरात कडकडीत बंद सारखीच परिस्थिती व रस्त्यांवर शुकशुकाट होता. दिल्ली नाका, अकोले नाका, नवीन नगर रस्ता, निमोण नाका आदी ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. घराबाहेर पडलेल्या नागरिकांची पोलीस चौकशी करत होते. विनाकारण बाहेर पडणाऱ्यांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली.
----------------
दोन दिवसांत ५० हजारांचा दंड वसूल
१४ एप्रिल रात्री आठ वाजल्यापासून राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यानंतर, १६ व १७ एप्रिल असे दोन दिवस पोलीस पथकाने शहरात विविध ठिकाणी कारवाई केली. ‘बेक्र द चेन’च्या पार्श्वभूमीवर घालून दिलेल्या निर्बंधाचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. यात कारवाईदरम्यान ५० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.