Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2025 14:47 IST2025-12-21T14:39:27+5:302025-12-21T14:47:35+5:30
डॉ. मैथिली तांबे ठरल्या महाराष्ट्रात सर्वाधिक मतांनी निवडून येणाऱ्या नगराध्यक्षा

Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: गेल्या चाळीस वर्षांतील सर्वात अटीतटीची आणि हाय-व्होल्टेज ठरलेली संगमनेर नगरपरिषदेची निवडणूक तांबे-थोरात परिवाराने एकतर्फी जिंकली आहे. संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या या लढाईत डॉ. मैथिली सत्यजित तांबे यांनी विरोधकांना पराभूत करत नगराध्यक्षपदावर नाव कोरले आहे. महत्त्वाचे म्हणजे तब्बल १६,६४४ मतांचे मताधिक्य घेत त्यांनी महाराष्ट्रात सर्वाधिक फरकाने विजयी होण्याचा मान मिळवला आहे.
केवळ नगराध्यक्षपदच नव्हे, तर नगरसेवक पदाच्या निवडणुकीतही'संगमनेर सेवा समिती'ने विरोधकांचा सुपडा साफ केला आहे. एकूण ३० जागांपैकी २७ जागांवर समितीचे उमेदवार विजयी झाले असून, विरोधकांना केवळ नावापुरत्या जागांवर समाधान मानावे लागले. यामध्ये शिवसेनेचा १ आणि २ अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे.
संगमनेरकर तांबेंच्या पाठीशी
ही निवडणूक तांबे-थोरात विरुद्ध खताळ-विखे अशा मोठ्या संघर्षात रूपांतरित झाली होती. महायुतीच्या उमेदवार सुवर्णा खताळ यांच्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुजय विखे पाटील यांनी मोठी ताकद लावली होती. मात्र, संगमनेरच्या मतदारांनी आमदार बाळासाहेब थोरात आणि सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा विश्वास दाखवला.
'संगमनेर २.०' चा नवा संकल्प
या ऐतिहासिक विजयानंतर बोलताना सत्यजित तांबे यांनी मतदारांचे आभार मानले."हा विजय संगमनेरच्या जनतेने आमच्यावर दाखवलेल्या अढळ विश्वासाचे प्रतीक आहे. आता 'संगमनेर २.०' च्या संकल्पनेतून आम्ही शहराचा कायापालट करू आणि विकासाला एका नव्या उंचीवर नेऊ," असं सत्यजित तांबे म्हणाले.
मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच डॉ. मैथिली तांबे यांनी घेतलेली आघाडी शेवटपर्यंत वाढतच गेली. निकाल स्पष्ट होताच संगमनेर शहरात कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत आणि फटाक्यांची आतिषबाजी करत आनंद साजरा केला. या विजयामुळे संगमनेरचा बालेकिल्ला पुन्हा एकदा थोरात आणि तांबे यांच्याकडे गेल्याचे सिद्ध झाले आहे.