मेहेरबाबा ट्रस्टच्या कामगारांची पगारवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:19 IST2021-03-24T04:19:57+5:302021-03-24T04:19:57+5:30
अवतार मेहेरबाबा ट्रस्टच्या कामगारांची वेतन कराराची मुदत मार्च २०२० मध्ये संपली असताना नवीन करार करून महागाई निर्देशांकानुसार वेतन मिळण्याची ...

मेहेरबाबा ट्रस्टच्या कामगारांची पगारवाढ
अवतार मेहेरबाबा ट्रस्टच्या कामगारांची वेतन कराराची मुदत मार्च २०२० मध्ये संपली असताना नवीन करार करून महागाई निर्देशांकानुसार वेतन मिळण्याची मागणी लाल बावटा (आयटक) संलग्न अवतार मेहेरबाबा कामगार युनियनने लावून धरली होती. यावेळी लाल बावटा विडी कामगार युनियन उपाध्यक्षा भारती न्यालपेल्ली, संजय कांबळे, विजय भोसले, अनिल फसले, सुभाष शिंदे, सुनील दळवी, राधाकिसन कांबळे, प्रभाताई पाचारणे, सुनिता जावळे, प्रवीण भिंगारदिवे आदींसह कामगार उपस्थित होते. दोन वर्षांसाठी ४ हजार ७५० रुपयांची पगारवाढ देण्याची सहमती ट्रस्टच्या विश्वस्तांनी दर्शविल्याचे पत्रकात म्हटले आहे.
--------------
मल्लांची स्पर्धेसाठी निवड
अहमदनगर : जिल्हा कुस्ती मल्लविद्या महासंघातर्फे ६४ व्या महाराष्ट्र राज्य वरिष्ठ अजिंक्यपद स्पर्धा (अधिवेशन) व महाराष्ट्र केसरी किताबच्या लढतीसाठी निवड झालेल्या शिवछत्रपती कुस्ती संकुलमधील कुस्ती मल्लांचा व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या वस्तादांचा सत्कार करण्यात आला. अहमदनगर जिल्ह्याची निवड चाचणी नुकतीच संगमनेर येथे पार पडली. या निवड चाचणीत शिव छत्रपती कुस्ती संकुल पारनेर येथील अनेक मल्लांनी विविध वजन गटात या संकुलाचे संस्थापक पारनेर तालुका तालिम संघाचे अध्यक्ष युवराज पठारे (वस्ताद) यांच्या मार्गदर्शनाखाली यश संपादन केले. त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
-----------------
देहदानाच्या संकल्पाने शहीद दिन साजरा
अहमदनगर : फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्यावतीने मंगळवारी शहीद दिन देहदानाच्या संकल्पाने साजरा करण्यात आला. पत्रकार चौकातील शहीद भगतसिंह स्मारक येथे देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणारे शहीद भगतसिंह, सुखदेव व राजगुरु यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी देहदानाच्या संकल्पाचे अर्ज भरून घेण्यात आले. यावेळी फिनिक्स फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जालिंदर बोरुडे, रतन तुपविहीरे, अशोक मिसाळ, संजय भिंगारदिवे, सुखवेंदरसिंह जग्गड आदी उपस्थित होते.
----------------
प्रगत कला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे यश
अहमदनगर : प्रगत कला महाविद्यालयाच्या मूलभूत अभ्यासक्रम (फाऊंडेशन) या वर्गातील विद्यार्थी जाकीर शेख याच्या चित्राची निवड द बॉम्बे आर्ट सोसायटीच्या वार्षिक स्पर्धा प्रदर्शनात झाली आहे. हे चित्र २२ इंच बाय ३० इंच आकाराचे आहे. स्थिरचित्र (स्टील लाईफ) या विषयाचे हे चित्र कागदावर जलरंग वापरून पूर्ण करण्यात आले आहे. या चित्रांमध्ये फळांवरील व वस्तूंवरील छाया प्रकाशाचा उत्कृष्ट परिणाम पहावयास मिळतो, अशी माहिती प्राचार्य नुरील भोसले यांनी दिली.
प्रगत कला महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी शादाब काझी हा मागील वर्षी आर्ट टीचर डिप्लोमा(एटीडी) उत्तीर्ण झाला. त्यास यावर्षी आर्ट सोसायटी ऑफ इंडिया या नामांकित संस्थेच्या स्पर्धा प्रदर्शनात विद्यार्थी विभागामध्ये पारितोषिक प्राप्त झाले आहे. अभिजीत पाटोळे याच्या चित्रास द आर्ट सोसायटी ऑफ इंडिया या स्पर्धा प्रदर्शनात पारितोषिक मिळाले आहे.