साई संस्थानने तातडीने ऑक्सिजन प्लांट सुरू करावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:20 IST2021-04-18T04:20:22+5:302021-04-18T04:20:22+5:30
शिर्डी : कोविड रुग्णांवरील उपचारासाठी आवश्यक ऑक्सिजनच्या पुरेशा उपलब्धतेसाठी साई संस्थानने हवेतून ऑक्सिजन मिळण्यासाठी तातडीने प्लांट उभारण्याचे निर्देश पालकमंत्री ...

साई संस्थानने तातडीने ऑक्सिजन प्लांट सुरू करावा
शिर्डी : कोविड रुग्णांवरील उपचारासाठी आवश्यक ऑक्सिजनच्या पुरेशा उपलब्धतेसाठी साई संस्थानने हवेतून ऑक्सिजन मिळण्यासाठी तातडीने प्लांट उभारण्याचे निर्देश पालकमंत्री तथा ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले.
राहाता तालुक्यातील कोरोनासंदर्भातील उपाययोजनांबरोबरच लसीकरणाचा आढावा घेऊन मुश्रीफ यांनी साई संस्थान इमारतीमधील कोविड केअर सेंटरची पाहणी केली. मुश्रीफ म्हणाले, संस्थानच्या दोन्ही रुग्णालयांत साडेपाचशे खाटा असून, त्यापैकी तातडीच्या नॉनकोविड उपचारासाठी शंभर खाटा राखीव ठेवून उर्वरित खाटा कोविड रुग्णांसाठी वापराव्यात. ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी आवश्यक यंत्रणा उभारावी, असेही त्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी भोसले यांनी ऑक्सिजन प्लांटला तातडीने परवानगी देऊ, असे सांगितले.
.....................
रेमडेसिविर इंजेक्शन संजीवनी नाही : हसन मुश्रीफ
कोपरगाव येथे ग्रामविकासमंत्री मुश्रीफ यांनी शनिवारी आढावा बैठक घेतली. ते म्हणाले, गेल्या काही दिवसांत रेमडेसिविर इंजेक्शन आणि ऑक्सिजनची मोठी मागणी वाढली आहे. पुढील दोन-तीन दिवसांत या इंजेक्शनचा तुटवडा कमी होईल. रेमडेसिविर इंजेक्शन हे संजीवनी नाही. त्याच्या वापरातून फक्त फुफ्फुसातील इन्फेक्शन कमी होते. एचआरसीटीचा स्कोर वाढला की, डॉक्टर लगेच रेमडेसिविर लिहून देतात. त्यामुळे नातेवाईक सैरभैर होतात. त्यामुळे गरज असलेल्या रुग्णासाठीच रेमडेसिविर वापरले जावे, असे मत त्यांनी व्यक्त केले.