साई संस्थानने तातडीने ऑक्सिजन प्लांट सुरू करावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:20 IST2021-04-18T04:20:16+5:302021-04-18T04:20:16+5:30
राहाता तालुक्यातील कोरोनासंदर्भातील उपाययोजनांबरोबरच लसीकरणाचा आढावा घेऊन मुश्रीफ यांनी साई संस्थान इमारतीमधील कोविड केअर सेंटरची पाहणी केली. यावेळी खासदार ...

साई संस्थानने तातडीने ऑक्सिजन प्लांट सुरू करावा
राहाता तालुक्यातील कोरोनासंदर्भातील उपाययोजनांबरोबरच लसीकरणाचा आढावा घेऊन मुश्रीफ यांनी साई संस्थान इमारतीमधील कोविड केअर सेंटरची पाहणी केली. यावेळी खासदार सदाशिव लोखंडे, आमदार राधाकृष्ण विखे, आमदार आशुतोष काळे, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, साईसंस्थानचे प्रभारी सीईओ रवींद्र ठाकरे, प्रांताधिकारी गोविंद शिंदे, तहसीलदार कुंदन हिरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. ओमप्रकाश पोखर्णा, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रमोद म्हस्के, साई संस्थानचे वैद्यकीय संचालक डॉ. प्रीतम वडगावे, डॉ. मैथिली पितांबरे, सचिन चौगुले, रमेश गोंदकर यावेळी उपस्थित होते.
मुश्रीफ म्हणाले, संस्थानने दोन्ही रुग्णालयांत साडेपाचशे खाटा असून, त्यापैकी तातडीच्या नॉनकोविड उपचारासाठी शंभर खाटा राखीव ठेवून उर्वरित खाटा कोविड रुग्णांसाठी वापराव्यात. ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी आवश्यक यंत्रणा उभारावी. संचारबंदी असूनही काही नागरिक रस्त्यावर फिरत आहेत. नागरिकांनी नियम पाळले नाहीत व कोरोना नियंत्रणात आला नाही तर शासनाला संचारबंदी वाढवावी लागेल. राहाता व आजूबाजूच्या तालुक्यातील कोविड रुग्णांवर उपचारासाठी शिर्डी येथे योग्य व्यवस्था केल्यास रुग्णांना दिलासा मिळेल, असेही त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी भोसले यांनी ऑक्सिजन प्लांटला तातडीने परवानगी देऊ असे सांगितले. रुग्णांना पुरविण्यात येणाऱ्या सेवा, औषधे, नास्ता, जेवण, परिसर स्वच्छता, पिण्याची पाण्याची व्यवस्था याबाबत पालकमंत्र्यांनी प्रत्यक्ष पहाणी करून समाधान व्यक्त केले.