साई संस्थानकडून पूरग्रस्तांसाठी १० कोटींचा मदतनिधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2019 12:35 IST2019-08-10T12:34:13+5:302019-08-10T12:35:04+5:30
पुरग्रस्तांच्या मदतीसाठी १० कोटी रुपयांचा मदतनिधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये जमा करण्यात येणार असल्याची माहिती संस्थानचे अध्यक्ष डॉ.सुरेश हावरे यांनी दिली.

साई संस्थानकडून पूरग्रस्तांसाठी १० कोटींचा मदतनिधी
शिर्डी : श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था, शिर्डीच्या वतीने राज्यातील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी १० कोटी रुपयांचा मदतनिधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये जमा करण्यात येणार असल्याची माहिती संस्थानचे अध्यक्ष डॉ.सुरेश हावरे यांनी दिली.
राज्यामध्ये मुसळधार पावसामुळे भीषण पूरपरिस्थिती निर्माण झालेली आहे. या जलप्रलयाच्या थैमानामुळे विशेषत: पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले असून परिस्थिती अतिशय बिकट बनली आहे. यामुळे हजारो नागरिक बेघर झाले असून अनेक गावेही उध्वस्त झालेली आहेत. ही नैसर्गिक आपत्ती भीषण असून आपले राष्ट्रीय कर्तव्य समजून या पुरग्रस्तांसाठी १० कोटी रुपयांचा निधी देण्याचा निर्णय श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था, शिर्डीच्या वतीने घेण्यात आल्याचे हावरे यांनी सांगितले. सदरचा निधी न्यायालयीन प्रक्रीयेस अधिन राहून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देण्यात येणार असून संस्थानच्या वतीने परिस्थिती बघून वैद्यकीय पथक व औषधे ही पाठविण्यात येणार आहे.
राज्य शासन पुरग्रस्तांच्या मदतीसाठी अहोरात्र परिश्रम घेत आहे. राज्यात आलेली ही आपत्ती मोठी असून या आपत्तीतून बाहेर पडण्यासाठी श्री साईबाबांच्या चरणी प्रार्थना करीत असल्याचे डॉ.हावरे यांनी सांगितले.