‘साईकृपा’ची लिलाव प्रकिया सुरू
By Admin | Updated: October 26, 2016 00:54 IST2016-10-26T00:39:15+5:302016-10-26T00:54:27+5:30
अहमदनगर : माजीमंत्री बबनराव पाचपुते यांच्या साईकृपा साखर कारखान्याच्या लिलावाची प्रक्रिया अखेर प्रशासनाने सुरू केली आहे़

‘साईकृपा’ची लिलाव प्रकिया सुरू
अहमदनगर : माजीमंत्री बबनराव पाचपुते यांच्या साईकृपा साखर कारखान्याच्या लिलावाची प्रक्रिया अखेर प्रशासनाने सुरू केली आहे़ कारखान्याची विक्री करून शेतकऱ्यांची थकबाकी दिली जाणार असून, कारखान्याच्या जमिनीवर सरकारचे नाव लावण्यात आले असून, कारखान्याची किंमत काढण्याचा आदेश श्रीगोंदा तहसीलदारांनी मंगळवारी दिला आहे़ बबनराव पाचपुते यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे़
माजीमंत्री बबनराव पाचपुते यांच्या साईकृपा कारखान्याने शेतकऱ्यांच्या उसाची बिले थकविली आहेत़ थकीत देणी मिळावी, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते़ या आंदोलनाची दखल घेऊन जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी बँकेचे प्रतिनिधी, कारखान्याचे अधिकारी आणि शेतकऱ्यांची संयुक्त बैठक बोलविली़ निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील, तहसीलदार वंदना खरमाळे, पंजाब नॅशनल बँकेचे अनुप कुमार, साईकृपा कारखान्याचे कैलास जरे, एच़ आऱ मुंडे, चंद्रकांत गुंगे, आंदोलनाचे प्रमुख राजेंद्र देवगावकर, कॉ. बाबा आरगडे, विधी सल्लागार अॅड़ कारभारी गवळी, देविदास कदम आदी शेतकरी बैठकीस उपस्थित होते़
साईकृपा कारखान्याने शेतकऱ्यांची ३५ कोटींची उसाची बिले थकविली आहेत़ ती मिळावी, या मागणीसाठी शेतकऱ्यांकडून सातत्याने पाठपुरावा सुरू आहे़ उच्च न्यायालयाने कारखान्याची विक्री करून शेतकऱ्यांची देणी देण्याचे आदेश दिला़ मात्र प्रशासनाकडून कार्यवाही होत नव्हती़ अखेर कारखान्याची विक्री करण्याच्या दिशेने प्रशासनाने पावले उचलली आहेत़ त्यात बँकेचीही कारखान्याकडे थकबाकी आहे़ प्रशासनाने कारखाना उभा असलेल्या जमिनीच्या सातबाऱ्यावर सरकारचे नाव लावले आहे़
कारखान्याची किंमत निश्चित करण्याच्यादेखील सूचना संबंधितांना केल्या आहेत़ किंमत निश्चित करून त्यानुसार कारखान्याचा लिलाव केला जाणार आहे़ कारखाना विक्रीतून मिळणाऱ्या पैशातून शेतकऱ्यांचे व्याजासकट पैसे देण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी कवडे यांनी दिल्यानंतर शेतकऱ्यांनी उपोषण मागे घेतले़
(प्रतिनिधी)
साईकृपा कारखान्याची विक्रीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे़ सातबाऱ्यावर सरकारचे नाव लावण्यात आले असून, कारखाना ताब्यात घेतला जाणार आहे़ कारखाना ताब्यात घेऊन त्याचा लिलाव करण्यात येणार आहे़ ही सर्व प्रक्रिया पूर्ण करून येत्या डिसेंबरमध्ये शेतकऱ्यांना व्याजासकट पैसे देण्याचे आश्वासन कवडे यांनी यावेळी दिले़