कोकमठाण ग्रामपंचातीवर तीस वर्षांनंतर फडकणार भगवा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:40 IST2021-02-05T06:40:22+5:302021-02-05T06:40:22+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोपरगाव : कोपरगाव तालुक्यात २९ ग्रामपंचायतींची निवडणूक नुकतीच पार पडली. त्यात बहुतांश ग्रामपंचायतींमध्ये आपल्याच पॅनलचे बहुमत ...

Saffron will hit Kokmathan Gram Panchayat after 30 years! | कोकमठाण ग्रामपंचातीवर तीस वर्षांनंतर फडकणार भगवा !

कोकमठाण ग्रामपंचातीवर तीस वर्षांनंतर फडकणार भगवा !

लोकमत न्यूज नेटवर्क

कोपरगाव : कोपरगाव तालुक्यात २९ ग्रामपंचायतींची निवडणूक नुकतीच पार पडली. त्यात बहुतांश ग्रामपंचायतींमध्ये आपल्याच पॅनलचे बहुमत असल्याने सरपंच आपलाच होणार याच गावचे पुढारी आनंदात होते. मात्र, गुरुवारी (दि.२८) सरपंच पदाची आरक्षण सोडत झाल्यानंतर अनेकांच्या आनंदात विरजण पडले. असेच काहीसे कोकमठाण ग्रामपंचायतीच्या बाबतीतही घडले आहे. तेथील सरपंचपदाचा एकमेव उमेदवार हा शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब जाधव यांच्या गटातून निवडून आलेला असल्याने तब्बल तीस वर्षांच्या संघर्षानंतर ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकणार आहे; परंतु सर्वाधिक सदस्य संख्या असलेल्या (काळे गट) राष्ट्रवादीची मात्र, गोची झाली आहे.

कोकमठाण ग्रामपंचायतीमध्ये १७ पैकी आ. आशुतोष काळे गटाचे (राष्ट्रवादी काँग्रेस) सर्वाधिक ९ सदस्य, त्या खालोखाल बाळासाहेब जाधव गटाचे (शिवसेना) ६ सदस्य तर माजी आ. स्नेहलता कोल्हे गटाचे (भाजप) २ सदस्य निवडून आले आहेत. ही निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना यांनी महाविकास आघाडीकरून एकत्रित लढविली होती. त्यानुसार सर्वाधिक सदस्य हे राष्ट्रवादीचे असल्याने त्यांचा सरपंच व त्या खालोखाल सदस्य असलेल्या शिवसेनेचा उपसरपंच असे समीकरण ठरले होते. त्यामुळे काही झाले तरी सरपंच आपलाच होणार याच आनंदात राष्ट्रवादीचे सदस्य होते. मात्र, गुरुवारी झालेल्या आरक्षण सोडतीत सत्ता स्थापनेचे सर्व गणितच बदलून गेले. कारण, कोकमठाणचे सरपंच पद हे अनुसूचित जातीच्या महिलेसाठी राखीव झाले आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादीच्या ९ सदस्यांपैकी एकही महिला या प्रवर्गातून निवडून आलेली नाही. मात्र, शिवसेनेकडून या प्रवर्गातील उषाबाई एकनाथ दुशिंग या एकमेव महिला निवडून आल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या सरपंच पदाच्या अधिकृत घोषणेची फक्त औपचारिकता बाकी राहिलेली आहे. सरपंच आपलाच होणार ही राष्ट्रवादीची पुढील पाच वर्षांसाठीची आशा धूसर झाली आहे. त्यामुळे सर्वाधिक सदस्य असतानादेखील त्यांना उपसरपंच पदावर समाधान मानावे लागणार आहे.

..................

ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत गेल्या ३० वर्षांपासून शिवसैनिकांनी संघर्ष केला आहे. कधीच पूर्ण यश मिळाले नाही. यंदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडी करून लढल्यानंतर सहा सदस्य निवडून आले आहेत. त्यामुळे सरपंच राष्ट्रवादीचा आणि उपसरपंच शिवसेनेचा असे समीकरण ठरले होते. योगायोगाने जे आरक्षण निघाले त्या पदाची महिला उमेदवार आमच्याकडे असल्याने आमचा सरपंच होऊन ग्रामपंचायतीवर ३० वर्षांनंतर भगवा फडकणार असल्याचा आनंद आहे. मात्र, ग्रामपंचायतीचा कारभार हा राष्ट्रवादीला बरोबर घेऊनच चालवणार आहोत.

- बाळासाहेब जाधव, माजी उपजिल्हाप्रमुख, शिवसेना.

Web Title: Saffron will hit Kokmathan Gram Panchayat after 30 years!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.