ग्रामीण संशोधकांनी नवतंत्रज्ञान आत्मसावे
By Admin | Updated: August 21, 2014 22:57 IST2014-08-21T21:30:33+5:302014-08-21T22:57:41+5:30
लोणी येथील महाविद्यालयामध्ये विज्ञान व तंत्रज्ञानातील आधुनिक प्रवाह व आव्हाने या विषयावर आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन डॉ. निमसे यांच्या हस्ते करण्यात आले.

ग्रामीण संशोधकांनी नवतंत्रज्ञान आत्मसावे
लोणी : नव्या तंत्रज्ञानाची कास धरून ग्रामीण भागातील संशोधकांनी ते आत्मसात करण्याची ही वेळ असून, लोणी येथे होत असलेले आंतरराष्ट्रीय चर्चासत्र विज्ञान आणि तंत्रज्ञानातील संशोधनाच्या दृष्टीने फलदायी ठरेल, असा विश्वास अखिल भारतीय विज्ञान परिषदेचे अध्यक्ष अािण लखनौ विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सर्जेराव निमसे यांनी व्यक्त केला.
लोणी येथील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या पद्मश्री विखे पाटील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयामध्ये विज्ञान व तंत्रज्ञानातील आधुनिक प्रवाह व आव्हाने या विषयावर आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन डॉ. निमसे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी ज्येष्ठ नेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील, प्रवरा मेडिकल ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र विखे पाटील, रशिया येथील संशोधक डॉ. लिंगा किडगे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे, डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एस. एम. पवार, जपान येथील संशोधक डॉ. पंकज कोणीकर, प्रवरा अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शशांक दळवी आदी मान्यवर उपस्थित होते.
प्राचार्य डॉ. संपतराव वाळुंज यांनी चर्चासत्र आयोजित करण्यामागील भूमिका विषद केली तर उपप्राचार्य प्रदिप दिघे, प्रा. डॉ. अनिल कुऱ्हे यांनी संशोधकांचे स्वागत केले.
डॉ. निमसे म्हणाले की, मानवी जीवन सुसह्य होण्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा मोठा सहभाग असून, या दोन्हींची सांगड घालून ग्रामीण भागातही नवीन शास्त्रज्ञांनी ते आत्मसात करावे. लोणी येथे होत असलेले आंतरराष्ट्रीय चर्चासत्र हे विज्ञानाचे सामाजिक केंद्र ठरू शकेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
डॉ. बाळासाहेब विखे म्हणाले की, परदेशात सुरू असलेल्या संशोधनाप्रमाणे भारतातही संशोधनाला चालना मिळावी यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. प्रवरानगर हे नव्या तंत्रज्ञानाच्या प्रसारात मोलाचा वाटा उचलण्यास नक्कीच पुढाकार घेईल.
तीन दिवस चालणाऱ्या या आंतरराष्ट्रीय परिषदेत पदार्थ विज्ञान, रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र, भूशास्त्र, शेतीशास्त्र, आरोग्यशास्त्र, संगणकशास्त्र व तंत्रज्ञानावर चर्चा होणार आहे. सूत्रसंचालन प्रा. संगिता धिमते व प्रा. वैशाली मुरादे यांनी केले. प्रा. बी. जी. थोरात व उपप्राचार्य डॉ. आर. जी. रसाळ यांनी आभार मानले. (वार्ताहर)
४५० संशोधकांचा सहभाग
या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी जपान, स्पेन, अमेरिका, थायलंड आदी देशातील संशोधकांसह देशभरातील विद्यापीठ व महाविद्यालयीन ४५० संशोधक सहभागी झाले होते. तर विविध महाविद्यालयातील २०० पेक्षा जास्त विद्यार्थी विद्यार्थिनी या चर्चासत्रासाठी उपस्थित होत्या. सुमारे ४५० शोधनिबंधांचा अंतरभाव असलेल्या पुस्तिकेचे यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.