इथेनॉल निर्मितीतून ग्रामविकास शक्य
By Admin | Updated: August 19, 2014 02:15 IST2014-08-19T01:45:31+5:302014-08-19T02:15:23+5:30
अहमदनगर: जिल्ह्यात साखर कारखाने मोठ्या प्रमाणात आहेत़ साखर कारखान्यांनी इथेनॉल निर्मिती केल्यास परदेशात जाणारे २ लाख कोटी ग्रामीण भागात जातील

इथेनॉल निर्मितीतून ग्रामविकास शक्य
अहमदनगर: जिल्ह्यात साखर कारखाने मोठ्या प्रमाणात आहेत़ साखर कारखान्यांनी इथेनॉल निर्मिती केल्यास परदेशात जाणारे २ लाख कोटी ग्रामीण भागात जातील आणि ग्रामीण भागाचा विकास होईल, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग, जहाजबांधणी व ग्रामविकासमंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी येथे केले.
पद्मशाली समाजाच्या शैक्षणिक संकुल भवनाचे भूमिपूजन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले़ त्यावेळी ते बोलत होते़ तत्पूर्वी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा सुशोभीकरण कामाचे उदघाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले़ भाजपाचे राष्ट्रीय सचिव श्याम जाजू, खा़ दिलीप गांधी, आ़ शिवाजीराव कर्डिले, आ़ राम शिंदे, जिल्हाध्यक्ष अभय आगरकर यावेळी उपस्थित होते़ देशाला मोठ्या प्रमाणात इंधन आयात करावी लागते़ ही आयात कमी करून इथेनॉल वापरावर भर दिला जाईल़ नगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात साखर कारखाने आहेत़ साखर कारखान्यांनी इथेनॉल निर्मितीला प्राधान्य देणे गरजेचे आहे़ त्यामुळे ग्रामीण भागाचा विकास होणार असून, शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर, ट्रक आदी वाहने इथेनॉलवर चालतील आणि ग्रामीण भागात हा पैसा जाईल, असे यावेळी गडकरी म्हणाले़
पारंपरिक उद्योग काळाच्या ओघात बंद पडले़ त्यामुळे अनेकांचा रोजगार गेला़ उद्योग क्षेत्रात मोठी स्पर्धा वाढली आहे़ स्पर्धेत टिकण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर होत आहे़ तुलनेत पारंपरिक उद्योग काळानुसार बदलले नाही़ त्यामुळे या उद्योगांसमोर अनेक अडचणी उभ्या राहिल्या आहेत़ विडी उद्योगाचीही यापेक्षा वेगळी स्थिती नाही़ जे काल होते ते आज नाही, असे सांगून नगर शहरातील विडी कामगारांना शासनाच्या योजनेतून घरे देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले़ एकविसावे शतक अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे आहे़ज्ञानाचे संपत्तीत रुपांतर करण्याची गरज असून, आपल्याकडील मुले अमेरिकेतील आयटी कंपन्यांत मोठ्या पगारावर नोकरी करत आहेत़ प्रत्येक घरातून डॉक्टर, इंजिनिअर, आयएएस झाले पाहिजेत़ त्यासाठी शिक्षणाचा आधार घेतला पाहिजे़ शासनाने प्रत्येक गावात इंटरनेटची सुविधा निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे़ जगातील घडामोडींची माहिती काही क्षणात ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना उपलब्ध होणार असून, प्रत्येक क्षेत्रासाठी इंटरनेट महत्वाचे आहे़ बायो टेक्नॉलॉजीचा अधिक वापर करणे गरजेचे असून, कृषी क्षेत्रात बायो टेक्नॉलॉजी वापरल्यास ग्रामीण भागाचा कायपालट होईल, असे गडकरी यावेळी म्हणाले़ (प्रतिनिधी)