कारखान्यांची धावपळ
By Admin | Updated: January 12, 2016 23:35 IST2016-01-12T23:26:45+5:302016-01-12T23:35:17+5:30
राहुरी/अकोले : शासनाने ठरवून दिलेली एफआरपीची रक्कम ठराविक वेळेत ऊस उत्पादकांच्या खात्यात दाखल न केल्याने साखर आयुक्तांकडून संबंधित कारखान्यांच्या गाळप रद्दची कारवाई

कारखान्यांची धावपळ
राहुरी/अकोले : शासनाने ठरवून दिलेली एफआरपीची रक्कम ठराविक वेळेत ऊस उत्पादकांच्या खात्यात दाखल न केल्याने साखर आयुक्तांकडून संबंधित कारखान्यांच्या गाळप रद्दची कारवाई झाल्याने जिल्ह्यातील कारखान्यांची धावपळ उडाली. राहुरीतील प्रसाद शुगर, अकोल्यातील अगस्ती तर पाथर्डीतील वृद्धेश्वर साखर कारख्यान्यांचा त्यात समावेश आहे.
कारवाईनंतर कारखाना प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली. प्रसाद शुगरने तर लगेच दुसऱ्या दिवशी एफआरपीप्रमाणे उसाची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वर्ग केली.
या संदर्भात प्रसाद शुगरचे अध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांनी पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला. शासनाने हा परवाना तात्पुरता रद्द केला असला तरी तो पूर्ववत मिळणार असून शेतकऱ्यांना अन्य कारखान्यांप्रमाणे भाव देण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. गेल्या गळीत हंगामात प्रसाद शुगरने साडेतीन लाख मेट्रिक टन उसाचे गाळप केले होते़ मागील एफआरपी शंभर रूपये प्रतिटनाप्रमाणे देण्यात आली़ उर्वरित चार कोटी रुपयांची एफआरपी रक्कम शेतकऱ्यांच्या खाती जमा करण्यात आली आहे, असे तनपुरे यांनी सांगितले.
शासनाने कर्जरूपी पॅकेज देण्याची घोषणा केली होती़ मात्र, ती फसवी असून त्याचा कारखान्याला लाभ झाला नाही़ शेतकऱ्यांची परिस्थिती लक्षात घेता जानेवारीत शेतकऱ्यांच्या खात्यात पेमेंट वर्ग करण्याचा निर्णय घेण्यात आला़ प्रसाद शुगरकडे अन्य उपपदार्थ उत्पादनाचे स्त्रोत नाहीत. शासनाकडे कारखाना सुरू करण्यासाठी नियमाप्रमाणे परवानगी घेण्यात आली़ त्यानंतर कारखाना सुरू झाला़ दररोज ३२०० मेट्रिक टन उसाचे गाळप होत आहे़
राहुरी, श्रीगोंदा, गंगापूर, नेवासा या तालुक्यांतून ऊस आणून गाळप केले जात आहे़ यंदा साडेतीन लाख मेट्रिक टन ऊस गाळप करण्याचे उद्दिष्ट्य ठेवण्यात आले असून शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ऊस कारखान्याला द्यावा, असे आवाहन प्राजक्त तनपुरे यांनी केले़
(तालुका प्रतिनिधी)
‘अगस्ती’ साखर आयुक्तालयात
परवाना रद्दची कारवाई होताच अकोल्यातील अगस्ती कारखान्याच्या प्रशासनाने साखर आयुक्त कार्यालयाकडे धाव घेतली. कारखान्याचे कार्यकारी संचालक वसंत बावीस्कर यांना याबाबत विचारले असता, त्यांनी आपण सध्या त्याच कामासंदर्भात पुणे येथे साखर आयुक्त कार्यालयात आहोत. या निर्णयाविरोधात कारखान्याकडून अपील दाखल करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. सध्या अगस्ती कारखान्याची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. त्यात झालेल्या या कारवाईमुळे गोंधळाचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, कारखान्याच्या १९ जागांसाठी १२६ अर्ज दाखल झाले.