गॅस ग्राहकांना २० रुपयांचा भुर्दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:25 IST2021-09-12T04:25:07+5:302021-09-12T04:25:07+5:30
-------- लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : दर महिन्याला गॅस सिलिंडरचे दर वाढत आहेत. प्रत्येक महिन्याला ५० किंवा २५ रुपयांची ...

गॅस ग्राहकांना २० रुपयांचा भुर्दंड
--------
लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : दर महिन्याला गॅस सिलिंडरचे दर वाढत आहेत. प्रत्येक महिन्याला ५० किंवा २५ रुपयांची वाढ होते. त्यामुळे आधीच मेटाकुटीला आलेल्या गृहिणींना सिलिंडर घरपोहोच देणाऱ्या एजन्सीच्या कर्मचाऱ्याला (डिलिव्हरी बॉय) २० रुपये अधिकचे द्यावे लागत आहेत. आता महागाईमुळे या २० रुपयांचा नाहक भुर्दंड गृहिणींना पडतो. ही एक प्रकारची लूट नाही का, असा सवाल गृहिणींनी केला आहे.
गॅस सिलिंडरचे दर दर महिन्याला वाढत आहेत. सध्या अहमदनगर शहरात ८९८ रुपयांना गॅस सिलिंडर मिळतो. मात्र घरपोहोच गॅस घेताना गृहिणींना ९२० रुपये मोजावे लागत आहेत. घरपोहोच सिलिंडर देणाऱ्यांकडून कोणतीही पावती दिली जात नाही. त्यामुळे या २० रुपयांचा कुठेही हिशेब नसतो. मात्र वादविवाद नको असे म्हणत अनेक गृहिणी २० रुपये देऊन टाकतात. त्यात डिलिव्हरी बॉय हा नेहमीचाच असल्याने त्याच्याशी वाद कोणीच घालत नाही. काही गृहिणींना हे २० रुपये भुर्दंड वाटतो, तर काही गृहिणी स्वखुशीने हे वरचे २० रुपये देतात. मात्र आधीच महागाईचा भडका, त्यात हा २० रुपयांचा भुर्दंड कशाला, असा सवाल महिला करीत आहेत.
--------------
सध्याचा गँस सिलिंडर दर- ८९८
डिलिव्हरी बॉयला दिली जाणारी रक्कम-९२०
-----------
वर्षभरात तीनशे रुपयांची वाढ
सप्टेंबर-२०२० मध्ये एक गॅस सिलिंडर ६०७.५० रुपयांना मिळत होता. सप्टेंबर-२०२१ मध्ये तो ८९८ रुपयांना मिळत आहे. त्यामुळे वर्षभरात २९१ रुपये म्हणजेच तीनशेपर्यंत ही वाढ झाली आहे. वरचे २० रुपये समाविष्ट केले तर ही वाढ तीनशेच्या पुढे जाते.
---------
आम्ही काही कोणाला जादा रक्कम देण्याचे सांगत नाहीत. डिलिव्हरी बॉयचे आणि ग्राहकांचे संबंध चांगले असतात. काही ग्राहक वेळेवर सिलिंडर पोहोच करतात, म्हणून स्वखुशीने वरचे २० रुपये देतात. यामध्ये एजन्सीचा काहीही संबंध नसतो. ग्राहकांनी गॅस सिलिंडरच्या किमती जाणून घ्याव्यात.
- एक वितरक, अहमदनगर
----------
आमच्या घरी एकच गॅस सिलिंडर आहे. तो संपला की डिलिव्हरी बॉयला आम्ही फोन करतो. फोन केला की आम्हाला सिलिंडर मिळतो. त्याआधी आम्ही ऑनलाइन बुकिंगही करतो. तरीही वेळेवर सिलिंडर दिल्याने स्वखुशीने आम्ही डिलिव्हरी बॉयला २० रुपये देतो.
-लक्ष्मीबाई शिंदे, नगर
----------
सध्या महागाई मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. ९०० रुपयांना गॅस सिलिंडर परवडत नाही. सिलिंडर जपून वापरतो. एक सिलिंडर घ्यायचे म्हटले तर महिनाभर केलेल्या कष्टातून पैसे बाजूला काढून ठेवतो. त्यात गॅस सिलिंडर देणाऱ्याला २० रुपये जास्तीचे देणे म्हणजे कसरत होऊन बसली आहे.
-सरुबाई गाडे, नगर
--------------