कुकडीतून घोड धरणात आवर्तन
By Admin | Updated: January 15, 2016 23:29 IST2016-01-15T23:26:39+5:302016-01-15T23:29:08+5:30
श्रीगोंदा : महाराष्ट्र जलसंपत्ती प्राधिकरणाच्या आदेशानुसार शुक्रवारपासून 'कुकडी' प्रकल्पातील वडज व डिंभे धरणातून घोड धरणात ८५० दशलक्ष घनफूट (0.८५ टीएमसी) पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे

कुकडीतून घोड धरणात आवर्तन
श्रीगोंदा : महाराष्ट्र जलसंपत्ती प्राधिकरणाच्या आदेशानुसार शुक्रवारपासून 'कुकडी' प्रकल्पातील वडज व डिंभे धरणातून घोड धरणात ८५० दशलक्ष घनफूट (0.८५ टीएमसी) पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. दोन टप्प्यात हे पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती नागवडे साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी पत्रकारांना दिली.
ते म्हणाले, घोड धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुळ प्रकल्प आराखड्यात समाविष्ट नसलेली धरणे व कोल्हापूर पध्दतीचे ७४ बंधारे बांधण्यात आले. त्यामुळे बारमाही सिंचन प्रकल्प असलेले घोड धरण पूर्ण क्षमतेने भरले जात नाही. घोड खालील शेतकरी व शेती पाण्याअभावी संकटात आली म्हणून समन्यायी धोरणानुसार 'कुकडी' प्रकल्पातून घोड धरणात दीड टीएमसी पाणी सोडण्याची मागणी आम्ही जलसंपत्ती प्राधिकरणाकडे याचिकेद्वारे केली होती. याचिकेवरील सुनावणीनंतर प्राधिकरणाने घोड धरणात १.६ टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश दिले होते. मात्र सदर याचिकेवरील पुनर्विलोकन याचिका दाखल झाल्यामुळे प्राधिकरणाच्या आदेशाची अंमलबजावणी झाली नव्हती. पुनर्विलोकन याचिकेच्या सुनावणीनंतर प्राधिकरणाने ५ जानेवारी रोजी कुकडी प्रकल्पातून घोड धरणात ०.८५ टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश जलसंपदा विभागाला दिले होते.
महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने आदेश दिल्यानंतरही जलसंपदा विभागाने पाणी सोडण्यास विलंब केला. ही बाब आपण पालकमंत्री राम शिंदे व जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्या निदर्शनास आणून दिली. अखेर मकरसंक्रांतीच्या दिवसापासून पहिल्या टप्प्यात कुकडी प्रकल्पातील वडज धरणातून मीना नदीद्वारे पाणी सोडण्याचा निर्णय झाला असून पुढील दहा दिवसात ४९८ दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यात येणार असल्याचे सांगून नागवडे म्हणाले, दुसऱ्या टप्प्यात डिंभे धरणातून ३५३ दशलक्ष घनफूट पाणी घोड धरणात सोडण्यात येणार आहे. कुकडी प्रकल्प ते घोड धरण्याच्या दरम्यान असलेले मीना नदीवरील २१ व घोड नदीवरील २३ असे एकूण ४४ कोल्हापूर पध्दतीचे बंधारे आहेत. या बंधाऱ्यात हे पाणी अडविले जावू नये यासाठी या बंधाऱ्यांच्या फळ्या (ढापे) काढण्यात येणार आहेत. याशिवाय नदीपात्रातील व बंधाऱ्यावरील कृषी उपसा जलसिंचन योजनांचा वीज पुरवठा घोड धरणात पाणी सोडण्याच्या कालावधीत बंद ठेवण्यात येणार असल्याचे नागवडे यांनी सांगितले. (तालुका प्रतिनिधी)