कुकडीचे पिण्यासाठी पोलीस बंदोबस्तात आवर्तन
By Admin | Updated: April 22, 2017 21:02 IST2017-04-22T21:02:07+5:302017-04-22T21:02:07+5:30
पोलीस बंदोबस्तात कुकडी प्रकल्पातून २५ एप्रिलपासून पिण्यासाठी आवर्तन सोडण्यावर प्रशासनाने शिक्कामोर्तब केले आहे.

कुकडीचे पिण्यासाठी पोलीस बंदोबस्तात आवर्तन
आॅनलाइन लोकमत
श्रीगोंदा (अहमदनगर), दि़ २२ - पोलीस बंदोबस्तात कुकडी प्रकल्पातून २५ एप्रिलपासून पिण्यासाठी आवर्तन सोडण्यावर प्रशासनाने शिक्कामोर्तब केले आहे. जिल्ह्यातील ३४ तलावांत ४१९ एमसीएफटी पाणी सोडण्यात येणार आहे. आवर्तन काळात कुकडी लाभक्षेत्रात जमावबंदी आदेश लागू करण्यात येणार असून आवर्तन काळात वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे.
जिल्हाधिकारी अनिल कवडे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी जलसंपदा, महसूल, पोलीस, महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांची कुकडी प्रकल्पातून सोडल्या जाणाऱ्या आवर्तनावर आढावा बैठक झाली. पिण्याच्या पाण्याचे चोख नियोजन करण्यासाठी पारनेर तालुक्यातील लोणीमावळा, सिरसुले, पिंपरी जलसेन, सांगवी सुर्या, वडुले जवक १, २, ३ कोहकडी, यादववाडी, राळेगणसिद्धी, श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर, मोहरवाडी, पारगाव, देऊळगाव, लेंडी, वडाळी, घोडेगाव, गव्हाणेवाडी, कोकणगाव, भावडी, तांदळी दुमाला, कर्जत तालुक्यातील दुरगाव, थेरवडी, पळस ओढा, राक्षसवाडी, पाटेवाडी, देशमुखवस्ती, चिलवडी, कुळधरण, चापडगाव व जामखेड तालुक्यातील चोंडी तलावात पाणी सोडण्याचे नियोजन केले आहे.
आवर्तन काळात कुकडी कालव्यावर भरारी पथके कालवा तलावावर पोलीस पहारा शेतकऱ्यांना समुहाने कालव्यावर येण्यास मज्जाव करण्यासाठी जमावबंदी आदेश लागू करण्यात येणार आहे. आवर्तन सुटल्यानंतर सुरूवातीला विसापूर तलावात पाणी सोडण्यात येणार आहे. त्यानंतर टेलकडे पाणी नेण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी तलावातील शेतीसाठी केला जाणारा उपसा बंद करण्यासाठी तलाव परिसरातील वीज पुरवठा खंडित करण्याच्या सूचना महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
आवर्तन कशाला सोडता?
कुकडी कालवा सल्लागार समितीच्या पहिल्या बैठकीत पाणी कुकडी आवर्तनांचे एकाच वेळेस नियोजन करताना शेतीसाठी तीन आवर्तने सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार शेतकऱ्यांनी पिकांचे नियोजन केले, पण ऐनवेळी दगा देण्यात आला आहे. परिणामी कुकडी लाभक्षेत्रातील फळबागा जळून जाणार आहेत. या भितीने शेतकरी चांगलेच संतप्त झाले आहेत. मग पिण्यासाठी आवर्तन सोडता कशासाठी? असा सवाल शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.