मिरजगावात वकिलाच्या घरावर दरोडा; गळ्याला तलवार लावून तीन लाखांचा ऐवज लुटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2020 11:26 IST2020-06-24T11:26:08+5:302020-06-24T11:26:47+5:30
मिरजगाव शहरातील मध्यवस्तीतील शिंगवी कॉलनीत राहणा-या एका वकिलाच्या घरावर दरोडेखोरांनी दरोडा टाकला. यावेळी दरोडेखोरांनी वकिलाच्या गळ्याला तलवार लावून घरातील तीन लाख रुपयांचा सोन्या, चांदीचा ऐवज लुटून नेला आहे.

मिरजगावात वकिलाच्या घरावर दरोडा; गळ्याला तलवार लावून तीन लाखांचा ऐवज लुटला
मिरजगाव : शहरातील मध्यवस्तीतील शिंगवी कॉलनीत राहणा-या एका वकिलाच्या घरावर दरोडेखोरांनी दरोडा टाकला. यावेळी दरोडेखोरांनी वकिलाच्या गळ्याला तलवार लावून घरातील तीन लाख रुपयांचा सोन्या, चांदीचा ऐवज लुटून नेला आहे. ही घटना बुधवारी पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास घडली.
पोलीस सूत्रांची माहिती अशी की, मिरजगाव (ता. कर्जत) येथील कडा रोडवरील शिंगवी कॉलनीत अॅड. मधुकर विठ्ठल कोरडे यांचे घर आहे. दरम्यान, मंगळवारी रात्री अॅड.कोरडे हे नेहमीप्रमाणे पत्नी व दोन मुलांसह झोपले होते. यावेळी बुधवारी पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास सात दरोडेखोर घराचा दरवाज्याचा कडी, कोयंडा कटावणीने तोडून घरात घुसले. प्रारंभी दरोडेखोरांनी किचनमध्ये प्रवेश केला.
किचनमध्ये उचकापाचक केल्याचा आवाज आल्याने अॅड. कोरडे व घरातील सर्व जण जागे झाले. परंतु त्यांनी आरडाओरड करण्याच्या आत एकाने धावत जाऊन अॅड. कोरडे यांच्या गळ्याला तलवार लावली. त्याने कोरडे यांच्या पत्नी व मुलांना एका खोलीत बसून ठेवले. त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली. यानंतर बाकी दरोडेखोरांनी घरातील सामानाची उचकापाचक करुन घरातील तीन लाख रुपयांचे सोन्या, चांदीचे दागिने चोरून नेले. जाताना दरोडेखोरांनी घराला बाहेरून कडी लावली होती.