संगमनेर तालुक्यातील लोणी ते नांदूरशिंगोटे रस्त्याने २१ लाख किमतीच्या मालट्रकमधून (सीजी ०४, एलपी ५६०१) ४० लाख ५१ हजार ९०१ रूपये किमतीचे ॲल्यु्मिनीअम इग्नोटस घेऊन चालक अजितकुमार सूर्यदेव यादव (वय ३२ वर्षे रा. चमंडी, जि. अरबल, बिहार ) हा प्रवास करीत होता. याच दरम्यान दोन दुचाकींवरून अंदाजे २५ ते ३० वयोगटातील पाचजण आले. पाच दरोडेखोरांच्या टोळीने अजितकुमार यादव यांच्याकडून मालट्रक बळजबरीने ताब्यात घेतला. त्यानंतर मालट्रक पळवून दापूर शिवारात नेला. त्याठिकाणी चालक व क्लिनरला ( दापूर शिवार ता. सिन्नर जि. नाशिक ) रस्त्याच्या बाजूला काही अंतरावर नेऊन बाभळीच्या झाडाला बांधून ठेवले व मालट्रक पळवून नेला. चालक व क्लिनरने सुटका करून घेऊन स्थानिक लोकांच्या मदतीने वावी पोलिसांना माहिती दिली. वावी पोलिसांनी घटनेची खात्री करीत संगमनेर तालुका पोलिसांना माहिती दिली. दरोडेखोरांनी चालक अजितकुमार यादव यांच्याजवळील पाच हजार रुपये किमतीचा मोबाईल, आधारकार्ड व ३ हजार रुपये काढून घेतले.
याप्रकरणी मालट्रक चालक अजितकुमार सूर्यदेव यादव यांनी शुक्रवारी रात्री फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात पाच दरोडेखोरांविरुद्ध संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विजय खंडीझोड यांच्या पथकाने तपास सुरु केला आहे.