बेलापूर (जि. अहिल्यानगर) : फत्त्याबादचे माजी सरपंच बाबासाहेब बाळाजी आठरे यांच्या घरी रविवारी (दि. २०) पहाटे दरोड्याचा प्रयत्न झाला. दरोडेखोरांना पाहताच आठरे यांच्या सून हर्षदा यांनी आरडाओरडा केल्यामुळे दरोडेखोर दागिने असलेले गाठोडे फेकून पळून गेले. सदर महिलेने आपल्याला ओळखले या संशयातून दरोडेखोरांनी दुसऱ्या दिवशी हर्षदा यांच्यासह त्यांच्या नणंद (आठरे यांची पुतणी) यांच्या अंगावर ॲसिड हल्ला केला. यात दोघी जखमी झाल्या असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.आठरे यांच्या घरी रविवारी रात्री चोरट्यांनी शिरकाव केला. दरोडेखोरांनी तोंडावर रुमाल बांधून दागिने लुटण्याचा प्रयत्न केला. घरातील सर्वांच्या तोंडावर दरोडेखोरांनी स्प्रे मारला. मात्र, हर्षदा या त्यातून वाचल्या. त्यांनी आरडाओरडा केल्याने दरोडेखोरांनी दागिन्यांचे गाठोडे तेथेच टाकले आणि पळ काढला.
घटनेच्या दुसऱ्या दिवशी सोमवारी हर्षदा आठरे आपल्या मुलीला घेऊन फत्त्याबाद येथे दवाखान्यात गेल्या. सोबत बाबासाहेब आठरे यांची पुतणी (हर्षदा यांची नणंद) होती. दवाखान्यातून घराकडे परत येत असताना दोन जण मोटारसायकलवरून आले. त्यांनी दाेघींच्या अंगावर ॲसिड फेकले. हर्षदा यांची पाठ भाजली तर आठरे यांच्या पुतणीच्या छातीला भाजले. त्यांना लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. याबाबत पोलिसांनी सांगितले की, घरातील सून व पुतणीवर झालेल्या रसायन हल्ल्यातील नुमने नाशिक येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. अहवाल आल्यानंतर केमिकल्स याबाबत अधिक माहिती मिळू शकेल.