सराफाचे १५ तोळ्याचे दागिने लुटले; कोपरगाव तालुक्यातील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2019 17:45 IST2019-12-13T17:44:45+5:302019-12-13T17:45:12+5:30
कोपरगाव तालुक्यातील जवळके येथील एका सराफाला चोरट्यांनी रस्त्यात अडवून १५ तोळे सोने व २० हजार रुपयांची रोकड पळवून नेल्याची घटना गुरुवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास चांदेकसारे ते पुणतांबा रस्त्यावर घडली.

सराफाचे १५ तोळ्याचे दागिने लुटले; कोपरगाव तालुक्यातील घटना
कोपरगाव : तालुक्यातील जवळके येथील एका सराफाला चोरट्यांनी रस्त्यात अडवून १५ तोळे सोने व २० हजार रुपयांची रोकड पळवून नेल्याची घटना गुरुवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास चांदेकसारे ते पुणतांबा रस्त्यावर घडली.
जवळके येथील गायत्री ज्वेलर्सचे मालक महेंद्र मुरलीधर कुलकर्णी (रा.सिध्दीविनायक टॉवर, सप्तर्षी मळा, कोपरगाव) हे गुरुवारी सायंकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास आपले दुकान बंद करून कोपरगावच्या दिशेने आपल्या दुचाकीवरून येत होते. यावेळी चांदेकसारे ते पुणतांबा फाटा दरम्यान अज्ञात तिघां चोरट्यांनी त्यांचा पाठलाग सुरू केला. त्यांना रस्त्यावरच असलेल्या माईल स्टोन हॉटेलजवळ साडेसात वाजता अडविले. त्यांना मारहाण व जीवे मारण्याची धमकी देऊन कुलकर्णी यांना कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत जवळच असलेल्या शेतात घेऊन गेले. यावेळी चोरट्यांनी त्यांच्याकडून पिशवीतील अंदाजे १५ तोळे सोन्याचे दागिने, २० हजार रोख रक्कम, हिशोबाच्या वह्या व मोबाईल पळवून नेला. त्यांना यावेळी चोरट्यांनी मारहाण केली. कुलकर्णी यांना मोठ्या प्रमाणात मुका मार लागल्याने त्यांना प्राथमिक उपचारासाठी कोपरगाव ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. सदर घटनास्थळी पोलिसांनी भेट दिली असून रात्री उशिरा कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.