पाण्यासाठी रास्तारोको

By Admin | Updated: June 3, 2014 00:27 IST2014-06-02T23:38:18+5:302014-06-03T00:27:45+5:30

शेवगाव : शहरटाकळी व २६ गावांच्या प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना गेल्या तीन महिन्यापासून बंद असल्यामुळे या योजनेवरील लाभार्थ्यांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे़

Road to water | पाण्यासाठी रास्तारोको

पाण्यासाठी रास्तारोको

शेवगाव : शहरटाकळी व २६ गावांच्या प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना गेल्या तीन महिन्यापासून बंद असल्यामुळे या योजनेवरील लाभार्थ्यांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे़ ही योजना सुरु करावी, ग्रामस्थांना टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरु आदी मागण्यांसाठी शेवगाव-नेवासा मार्गावर भातकुडगाव फाटा येथे रास्तारोको करण्यात आला़ प्रशासनाच्या निषेधार्थ महिलांनी रिकामे हंडे घेऊन रस्त्यावरच ठाण मांडल्याने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या़ सुमारे ६० हजार लाभार्थी नागरिकांची तहान भागविणार्‍या शहरटाकळी व २६ गावांच्या प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेचा पाणी पुरवठा थकीत वीजबिलाअभावी बंद झाला आहे़ या योजनेवर १८ लाख रुपयांचे वीज बिल थकले आहे़ या बिलाच्या वसुलीसाठी महावितरणने १८ फेब्रुवारीपासून या योजनेवरील वीज जोड तोडला आहे़ त्यामुळे एैन उन्हाळ्यात तब्बल साडेतीन महिन्यापासून योजना बंद अवस्थेत आहे़ त्यामुळे लाभार्थी गावांच्या ग्रामस्थांना न भुतो न भविष्यती अशा स्वरुपाच्या तीव्र पाणी टंचाईचा मुकाबला करावा लागत आहे. शहरटाकळी प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजना जिल्हा परिषदेकडे हस्तांतरीत करावी, टंचाईग्रस्त गावाना टँकर सुरू करावेत आदी मागण्यासाठी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष वाय. डी. कोल्हे, अशोक निंबाळकर, विलास फाटके आदींच्या नेतृत्वाखाली शेवगाव-नेवासा महामार्गावरील भातकुडगाव फाटा येथे सोमवारी रास्तारोको करण्यात आला़ आंदोलकांनी सुमारे तास भर राजमार्गावरील वाहतूक रोखून धरीत पाणी टंचाईबाबत आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. शहरटाकळीसह शेवगाव-पाथर्डी सह ५४ गावे तसेच बोधेगाव, बालमटाकळी सह ८ गावांच्या प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनांनाही यंदाच्या उन्हाळ्यात विविध अडचणीचे ग्रहण लागले आहे. शहरटाकळी व २६ गावांची प्रादेशिक पाणी पुरवठा योजना यंदाच्या उन्हाळ्यात सलग ८ दिवस एकदाही सुरू राहिली नाही. कधी वीज बिल तर कधी पाणीपट्टी थकल्याचे कारण दाखवून बिलाच्या वसुलीसाठी योजना सातत्याने बंद राहिली़ त्यामुळे सुमारे ६० हजार लाभार्थी नागरिकांच्या तोंडचे पाणी महावितरण आणि जिल्हा प्रशासनाने हिरावल्या आरोप यावेळी आंदोलकांनी केला़ जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाचे शाखा अभियंता बबन खोले, चंद्रकांत दहीफळे यांनी जि.प. देखभाल दुरुस्ती फंडातून रक्कम उपलब्ध करून योजना तातडीने सुरू करण्याचे आश्वासन दिले़ त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले़ शुक्रवार (दि़६) पर्यंत योजना सुरू न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा वाय. डी. कोल्हे दिला़ यावेळी गंगा खेडकर, मोहन लोंढे, बाळासाहेब सामृत, लक्ष्मण काशिद, आसाराम नरे, अण्णासाहेब सुकासे, राजेंद्र खंडागळे, संतोष आढाव, भाऊसाहेब जाधव आदी कार्यकर्त्यांनी पाणी टंचाईच्या समस्येबाबत प्रशासनावर टीकेची झोड उठविली. सहाय्यक पोलीस निरीक्षक बजरंग चौगुले, पो.उपनिरीक्षक केशव राठोड यांनी चोख बंदोबस्त ठेवला. (तालुका प्रतिनिधी)पाथर्डी तालुक्यातील करंजी येथील कान्होबावाडी येथे तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली असून, या गावातील महिलांना सध्या पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. कान्होबावाडी गावासाठी प्रशासनाने टँकरने पाणीपुरवठा सुरू केला. मात्र आठ दिवसानंतर एक खेप टँकरची या वाडीसाठी दिली जाते. त्यामुळे नुसता नावापुरताच टँकरने पाणीपुरवठा सुरू असल्याचा आरोप येथील ग्रामस्थांनी केला आहे. कान्होबावाडी येथील ग्रामस्थांना गेली दोन वर्षापासून पिण्याच्या पाण्याचा संघर्ष करावा लागत आहे. मागील वर्षी वारंवार मागणी केल्यानंतर या गावचा रस्त्याचा प्रश्न जि.प. उपाध्यक्षा मोनिका राजळे यांच्या माध्यमातून मार्गी लागला़ मात्र पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अद्याप रखडला आहे. कान्होबवाडीसाठी दिवसाआड टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी होत आहे.

Web Title: Road to water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.