रस्ता चकाचक, मात्र ना दिशादर्शक फलक ना पुलाला संरक्षक कठडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:20 IST2021-07-26T04:20:50+5:302021-07-26T04:20:50+5:30
अळकुटी : बेल्हा-शिरूर हा रस्ता अळकुटी (ता. पारनेर) परिसरात चकाचक बनला आहे. मात्र त्यावर दिशादर्शक फलक, तसेच पुलाला संरक्षक ...

रस्ता चकाचक, मात्र ना दिशादर्शक फलक ना पुलाला संरक्षक कठडे
अळकुटी : बेल्हा-शिरूर हा रस्ता अळकुटी (ता. पारनेर) परिसरात चकाचक बनला आहे. मात्र त्यावर दिशादर्शक फलक, तसेच पुलाला संरक्षक कठडे नसल्याने अपघाताला निमंत्रण मिळत आहे. रस्ता चकाचक असल्याने वाहनेही सुसाट असतात.
बेल्हा-शिरूर रस्ता नेहमीच चर्चेचा विषय ठरतो. कधी रस्त्याच्या कामाचा दर्जा, तर कधी ठेकेदाराकडून दुर्लक्ष, असे मुद्दे असतात. त्यातच या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वर्दळ वाढली आहे. तालुक्यातील अळकुटी येथील रस्त्यावर धोकादायक वळणावर दिशादर्शक फलक नाहीत. तसेच तेथील पुलाला कोणत्याही प्रकारचे संरक्षक कठडे बसविलेले नाहीत. त्याचठिकाणी ओढा आहे. दिशादर्शक फलक व संरक्षक कठडे नसल्याने वाहन चालकांना तेथे ओढा असल्याचे लक्षात येत नाही. रस्त्याने नियमित ये-जा करणाऱ्यांना माहिती असल्याने फारशी अडचण येत नाही. मात्र रस्त्यावरून जाणाऱ्या नवख्या व्यक्तींना माहिती नसल्याने अडचणी येऊ शकतात. लहान-मोठे अपघातही होऊ शकतात. सार्वजनिक बांधकाम विभागाने तत्काळ संबंधीत ठेकेदाराला दिशादर्शक फलक, संरक्षक कठडे बसविण्यास सांगावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
या रस्त्यावर सुपा एमआयडीसी, रांजणगाव एमआयडीसी येथे अनेक ट्रक, टेम्पो जातात. तसेच स्थानिक दळणवळणही मोठ्या प्रमाणावर असल्याने चालणाऱ्यांनाही त्रास सहन करावा लागतो.
-------
२५ अळकुटी रोड
बेल्हा-शिरूर रस्ता अळकुटी परिसरात चकाचक बनला. मात्र येथे दिशादर्शक फलक नाही.