रस्त्यांचे पॅचिंग डांबराशिवाय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:17 IST2020-12-25T04:17:02+5:302020-12-25T04:17:02+5:30
श्रीगोंदा : श्रीगोंदा नगरपालिकेने ३३ कोटी खर्च करून तयार केलेल्या १७ रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे काम युध्दपातळीवर हाती घेतले आहे. ...

रस्त्यांचे पॅचिंग डांबराशिवाय?
श्रीगोंदा : श्रीगोंदा नगरपालिकेने ३३ कोटी खर्च करून तयार केलेल्या १७ रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे काम युध्दपातळीवर हाती घेतले आहे. मात्र, खड्डे बुजविताना खालील पृष्ठभागावर डांबर का टाकले जात नाही, अशी विचारणा नागरिकांमधून केली जात आहे.
गेल्यावर्षी शहरातील १७ प्रमुख रस्त्यांची कामे करण्यात आली. परंतु, एकाच वर्षात रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. यामध्ये पारगाव रस्त्याची अधिक दुरवस्था झाली आहे. नगराध्यक्षा शुभांगी पोटे यांनी दिलेल्या सूचनेनुसार पालिका प्रशासनाने खड्डे बुजविण्याचे काम हात घेतले आहे. खड्डे बुजविताना खालील पृष्ठभागावर डांबर नियमानुसार टाकले जात नाही. याबाबत नागरिकांनी पालिकेकडे विचारणा केली आहे. श्रीगोंदा शहरात दिवसेंदिवस वाहतूक वाढत आहे. त्यामुळे रस्त्याची कामे दर्जेदार होतात का, याकडे पालिका प्रशासन व पदाधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे. अन्यथा भविष्यात नागरिक आपला राग लोकशाही मार्गाने व्यक्त करतील, असा इशाराही देण्यात आला आहे.
...................
खडीकरणाच्या खालील पृष्ठभागावर डांबर टाकण्याची गरज नाही. कारण, मोठी खडी टाकल्यानंतर दोनदा डांबर टाकले जात आहे. त्यामुळे खड्डे बुजविण्याचे काम अतिशय उत्कृष्ट होईल. त्यामुळे नागरिकांनी काळजी करू नये.
-अलोक श्रीवास्तव, तांत्रिक सल्लागार, नगरपालिका
.............
दोन वर्षे रस्त्यांच्या कामांची देखभाल व दुरुस्ती करणे ठेकेदाराची जबाबदारी आहे. खड्डे बुजविण्याचे काम हाती घेतले आहे. लहान-मोठी खडी टाकून दोनदा डांबर टाकून रोलिंग करून खड्डे बुजविले जात आहेत. चांगले काम करण्यासाठी पालिका कटिबद्ध आहे.
-शुभांगी पोटे, नगराध्यक्षा, श्रीगोंदा नगरपालिका