कावडींची परंपरा आधुनिकतेच्या वाटेवर
By Admin | Updated: April 6, 2016 23:56 IST2016-04-06T23:50:10+5:302016-04-06T23:56:19+5:30
उमेश घेवरीकर, शेवगाव श्रीक्षेत्र मढी येथील कानिफनाथांच्या संजीवन समाधीवर पैठणचा पवित्र जलाभिषेक घालण्यासाठी तळपत्या उन्हात कावडी मढीच्या दिशेने मार्गक्रमण करीत आहे़

कावडींची परंपरा आधुनिकतेच्या वाटेवर
उमेश घेवरीकर, शेवगाव
गुढीपाडव्याला भटक्यांची पंढरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्रीक्षेत्र मढी येथील कानिफनाथांच्या संजीवन समाधीवर पैठणचा पवित्र जलाभिषेक घालण्यासाठी तळपत्या उन्हात कावडी मढीच्या दिशेने मार्गक्रमण करीत आहे़ महाराष्ट्राच्या सांकृतिक व अध्यात्मिक परंपरेत या मानाचे स्थान असलेल्या या कावडींची परंपराही आधुनिकतेच्या वाटेवर धावत आहे़ मातीच्या घटापासून ते प्लॅस्टिकच्या ड्रमापर्यंत झालेला या कावडींचा प्रवास परंपरेतील बदलाचे द्योतक ठरत आहे़
यंदा सूर्य आग ओकत असतानाही ही परंपरा गावोगावच्या आबालवृद्धांनी कायम ठेवली. कावडीत तरुणांचा सहभाग मोठा आहे़ मढीकडे जाणाऱ्या अनेक कावडींनी मंगळवारी शेवगाव पार केले़ कानिफनाथ महाराजांच्या घोषणा व वाद्यांच्या गजराने शेवगाव भक्तिमय झाल्याचे दृष्य मंगळवारी व बुधवारी पहायला मिळाले़ कावडीच्या काठीला दोन्ही टोकांना मातीचे घट बांधून त्यात पैठणचे पवित्र जल नेले जाते़ कालानुरूप यात बदल होताना दिसतो. सध्या या मातीच्या घटांचे प्रमाण कमी होऊन त्यांची जागा तांब्याचे कलश, स्टील किंवा अॅल्युमिनियमचे डबे व आता प्लास्टीकचे छोटे ड्रम घेत आहे.
मानवी संस्कृतीच्या विकासात महत्वाचे टप्पे ठरलेल्या पाषाण युग, ताम्रयुग आणि धातुयुग वाढत्या प्लास्टिक वापरामुळे गळून पडले आहे़ आता प्लॅस्टिकचे युग म्हटले जाते़ कावडी घेऊन देव दर्शनाला जाणाऱ्यांनी हा बदल स्वीकारलाय़ परंपरा जपताना आधुनिकता स्वीकारणेही तितकेच महत्वाचे आहे, असा विचार या बदलाची पाईक असलेली तरुणाई सांगते़