शहर बससेवेसाठी रास्तारोको
By Admin | Updated: June 29, 2014 00:28 IST2014-06-28T23:43:20+5:302014-06-29T00:28:05+5:30
अहमदनगर : शहर बससेवा बंद झाल्याने केडगाव उपनगरातील महिला, विद्यार्थ्यांची, भाजी विक्रेते, कामगारांचे हाल होत आहेत.
शहर बससेवेसाठी रास्तारोको
अहमदनगर : शहर बससेवा बंद झाल्याने केडगाव उपनगरातील महिला, विद्यार्थ्यांची, भाजी विक्रेते, कामगारांचे हाल होत आहेत. महापालिकेने नफ्या तोट्याचा विचार न करता अभिकर्ता संस्थेशी बोलणी करून सेवा त्वरीत सुरू करावी या मागणीसाठी केडगावात शिवसेनेने रास्तारोको आंदोलन केले. तसे निवेदन नंतर महापालिका आयुक्तांना देण्यात आले.
केडगाव उपनगरातून शहरात येणाऱ्या नागरिकांना तसेच शालेय विद्यार्थी, महिलांना शहर बससेवेचा लाभ होत होता. मात्र ही सेवा बंद झाल्याने त्यांचे हाल सुरू झाले आहे. सेवा बंदमुळे आर्थिक झळ त्यांना सोसावी लागत आहे. अभिकर्ता संस्थेने बससेवा सुरू करण्यासाठी सात लाख रुपयांची दरमहा नुकसान भरपाईची मागणी महापालिकेकडे केलेली आहे. अन्य महापालिकेत बससेवा देणाऱ्या संस्थेला अनुदान दिले जाते. महापालिकेचा प्रशासकीय खर्च दरमहा पाच ते सहा कोटी रुपये आहे. त्यामुळे अभिकर्ता संस्थेची सात लाख रुपयांची नुकसान भरपाईची मागणी फार मोठी नाही, असे सातपुते यांचे म्हणणे आहे. सत्ताधाऱ्यांनी याबाबत तातडीने निर्णय घेऊन बससेवा सुरू करण्याची मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली. युतीची सत्ता असताना तत्कालीन महापौर शीला शिंदे व आमदार अनिल राठोड यांनी परिवहन आराखडा तयार करून त्यास शासनाची मान्यता मिळविण्यात यश मिळविले. आघाडीच्या सत्ताधाऱ्यांनी या प्रस्तावाचा पाठपुरावा करून निधी आणावा. त्यातून बस विकत घेऊन, बस थांबे, चौक सुशोभिकरण करण्याचे सातपुते यांनी यावेळी सुचविले. (प्रतिनिधी)