रावसाहेब शिंदे यांना बदलीचे वेध
By Admin | Updated: June 25, 2014 00:30 IST2014-06-24T23:30:49+5:302014-06-25T00:30:08+5:30
अहमदनगर: पोलीस अधीक्षक रावसाहेब शिंदे यांची सहा महिन्यांपासून पदोन्नती झाली आहे. मात्र त्यांना आवडीचे ठिकाण न मिळाल्याने त्यांची बदली अनेक महिन्यांपासून रखडली आहे.
रावसाहेब शिंदे यांना बदलीचे वेध
अहमदनगर: पोलीस अधीक्षक रावसाहेब शिंदे यांची सहा महिन्यांपासून पदोन्नती झाली आहे. मात्र त्यांना आवडीचे ठिकाण न मिळाल्याने त्यांची बदली अनेक महिन्यांपासून रखडली आहे. मात्र आता कोणत्याही क्षणी बदलीचा आदेश हाती पडण्याची शक्यता आहे. राज्यातील आयपीएस अधिकाऱ्यांच्या बुधवारी (दि.२५) बदल्या होणार आहेत. त्यामध्ये शिंदे यांच्या बदलीचा आदेश निघण्याची शक्यता आहे. त्यामुळे फायलींवर सह्या घेण्यासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची एकच धावपळ सुरू झाली आहे. त्यातच आयजी इन्स्पेक्शन सुरू असल्याने शिंदे व्यस्त आहेत.
जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक असलेल्या रावसाहेब शिंदे यांची रायगड येथून नगरला दोन वर्षांपूर्वी बदली झाली होती. त्यानंतर गेल्या जानेवारीमध्ये शिंदे यांची ‘डीआयजी’ या पदावर पदोन्नती झाली आहे. त्यावेळी पासून शिंदे बदलीच्या प्रतीक्षेत आहेत. शिंदे यांना ठाणे किंवा मुंबई येथेच बदली हवी होती. त्यांना त्यांच्या आवडीचे ठिकाण न मिळाल्याने त्यांची बदली सहा महिन्यांपासून रखडली होती. दरम्यान लोकसभा निवडणूक जाहीर झाली. निवडणूक आचारसंहितेमुळे हातातोंडाशी आलेला बदलीचा आदेश जागेवरच थांबला. त्यामुळे त्यांना निवडणूक होईपर्यंत नाईलाजास्तव थांबावे लागले. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता आणि प्रक्रिया १६ मे रोजी संपली. त्यानंतर पोलीस भरती प्रक्रिया पार पाडण्याची जबाबदारी शिंदे यांच्यावर येऊन पडली. त्यामध्ये एक महिना गेला. विना तक्रार आणि पारदर्शक पद्धतीने भरती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पोलिसांच्या लेखी परीक्षेचाही निकाल लागला. त्यामुळे आता त्यांना बदलीचे वेध लागले आहेत.
सोमवारपासून पोलीस अधीक्षक शिंदे व्यस्त आहेत. त्यांच्याकडे सहीसाठी येणाऱ्या फायलींची संख्या वाढली आहे. त्यामुळे ते याच कामात व्यस्त आहेत. ‘आता कोणत्याही क्षणी बदलीचा आदेश येईल’ असे खुद्द शिंदे यांनीच सांगितले.
विधानसभा नको!
रावसाहेब शिंदे यांच्या काळात ग्रामपंचायत, नगरपालिका, महापालिका, लोकसभा निवडणूक झाली. अत्यंत शांततेत आणि चोख बंदोबस्त ठेवून शिंदे यांनी त्यांच्या प्रशासकीय, व्यवस्थापकीय कौशल्याची निवडणूक काळात झलक दाखविली. त्यामुळेच निवडणुका शांततेत पार पडल्या. आता लवकरच विधानसभा निवडणुका जाहीर होणार आहेत. या निवडणुका होईपर्यंत थांबणार का? असा सवाल शिंदे यांना केला असता, ते म्हणाले, आता निवडणुका नको. आता माझी पदोन्नती झाली आहे. केव्हाही आदेश येईल. आदेश मिळताच नवीन ठिकाणी रुजू होईल.